Manoj Jarange Patil. Google
विदर्भ

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या सभेसाठी चरणगावात पेरणी थांबविली

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभांचा धडाका सुरू केला आहे. जरांगेंच्या सभेसाठी मराठा समाजाकडून नियोजन करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील चरणगावात होणाऱ्या सभेसाठी शेतकऱ्यांनी यंदा रब्बीची पेरणीच केलेली नाही. सभेसाठी तब्बल दीडशे एकरपेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावरील पेरणीची सर्व कामं थांबविण्यात आलीत.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखी वेळ देण्यास हरकत नाही, असं ते म्हणाले. सध्या त्यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ देत उपोषण मागे घेतलंय. (Farmers From Charangaon Of Akola District Stopped Sowing Work On 150 Acre Land For Public Meeting Of Manoj Jarange Patil For Maratha Reservation)

मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्यासाठी जरांगे पाटील राज्यभर दौरा करीत आहेत. मोठ्या प्रमाणात सभा घेण्यात येत आहेत. त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाददेखील भेटत आहे. या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील 4 डिसेंबरला मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव येथे समाज बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी शेगाव येथे मुक्काम करणार आहेत. मंगळवारी (ता. 5) ते अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चरणगाव येथे त्यांची जाहीर सभा घेणार आहेत. सभेसाठी अकोला सकल मराठा समाजाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सभा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील गावागावांत कॉर्नर बैठका घेण्यात येत आहेत. 150 एकरावर ही सभा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. सभेसाठी गावात येणाऱ्यांसाठी तीन ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. चरणगावातील जरांगे यांची सभा विदर्भातील सर्वांत मोठी व एकमेव सभा असेल. त्यासाठी या परिसरातील पेरण्यांची कामंही थांबविण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल 35 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असे चरणगाव येथील आंदोलकांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा उपोषण सुरू केल्यानंतर विदर्भातील एकमेव चरणगावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना चरणगावात सभेसाठी निमंत्रण दिलं होतं.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT