Protest For Farmer : बुलडाणा येथे सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर यांनी थेट मंत्रालयाचा ताबा घेण्याचा गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळं सतर्क झालेल्या पोलिसांनी तुपकर यांना नोटीस बजावली असून आंदोलन करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असं नोटीसमध्ये नमूद आहे. तुपकर यांच्या घरालाही पोलिसांनी वेढा घातला आहे.
पोलिसांनी बजावलेल्या या नोटीसनंतर तुपकर चांगलेच संतापले. अशा हजारो नोटिसांनी आपली कपाटं भरली आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गंभीर व्हायचं नसेल, तर मंत्रालयात मंत्री काय अंडी उबवायला बसलेत का, असा आक्रमक प्रश्नही त्यांनी केला. (Farmer's Leader Ravikant Tupkar From Buldhana in Aggressive Mode Criticized Government As Police Serve's Notice)
पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही तुपकर आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. अशा नोटीसची आपल्याला सवय आहे. आणखी कितीही नोटीस आल्या आणि कोणतीही कारवाई झाली, तरी मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका आता त्यांनी घेतली आहे. २९ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक देणारच व मंत्रालयाचा ताबा घेणारच, असे त्यांनी ठामपणे सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून तुपकरांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच तुपकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर राज्यव्यापी आंदोलन करीत आहेत. जिल्ह्यातील एल्गार रथयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी बुलडाण्यात एल्गार महामोर्चा काढला. त्याला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाला. मोर्चात तुपकरांनी सरकारला आठ दिवसांची मुदत दिली होती. २८ नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २९ नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. तुपकरांच्या आजवरच्या आंदोलनांचा अनुभव पाहता ते शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना होतील याची सर्वांनाच खात्री आहे. त्यामुळं पोलिसही सतर्क झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बुलडाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तुपकर यांना कलम 149 नुसार नोटीस बजावली आहे. आंदोलनामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अनुचित घटना घडू शकतात, त्यामुळं आंदोलन करू नये, असे नोटीसमध्ये नमूद आहे. कारवाई करण्याचा दमही पोलिसांनी त्यांना भरला आहे. आंदोलन तीव्र करण्यापूर्वी तुपकर आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची चर्चाही झाली. वळसे पाटील हे बुलडाण्याचे पालकमंत्रीही आहेत. दोन्ही नेत्यांमधील चर्चेतून कोणताही ठोस निष्कर्ष न निघाल्यानं तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.