Bachchu Kadu padyatra : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली 7/12 कोरा यात्रेला वेगानं पुढं जात आहे. वाशिम जिल्ह्यातून बच्चू कडू यांच्या दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेची मेंढपाळाच्या वेशात सुरवात झाली.
बच्चू कडू यांच्या या पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी सुकळी गावातील शेतकऱ्याने शेतात उपरोधात्मक भाजपचे झेंडे लावून लक्ष वेधले. तसंच शेतात फलक उभारून त्यावर बैलगाडी चालवताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मागे राज्यातील महायुती सरकारचे प्रमुख नेत्यांचा फोटो लावला आहे. शेतात लावलेले भाजपचे झेंडे अन् या फलकावरील मजकूर लक्ष वेधून घेत आहे.
शेतमालाला भाव नाही, कर्जमाफी होत नाही, त्यामुळे आता आमचं शेतही आम्ही भाजपला देऊन दिलं, या हेतूने भाजपचे झेंडे लावले आहेत. शेतात पेरून काही फायदा नाही, कारण पेरणीचाही खर्च निघत नाही. त्यामुळे पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावलेले बरे. वावरासहित तुमच्या पार्टीत येतो, असा उपरोधक टोला सुद्धा बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यावेळी लावला.
शेतात लावलेल्या भाजप (BJP) झेंड्यांबरोबर फलकावरील मजकूर लक्ष वेधून घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैलगाडी चालवताना दाखवले असून, ते चालवत असलेल्या बैलगाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. या फोटोच्या बाजूला हिंदू अन् मुस्लिम असे लिहिलेले आहे.
फलकावर गोरगरीब अन् निष्पाप लोकांच्या जीवावर उठलेले म्होरके! आता पेरण करणे बंद, एक तर गांजा, अफूचे पीक नाही, तर पक्षाचे झेंडे! अनियंत्रित कायदा-सु्व्यवस्था, दिव्यांगांची हेळसांड, जातीवाद, शेतकरी-शेतमजूर आत्महत्या, बेरोजगारी, ढीम्म प्रशासन, असुरक्षित महिला असा मजकूर लिहून लक्ष वेधलं आहे.
वाशिम जिल्ह्यातून बच्चू कडूंची दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेची मेंढपाळाच्या वेशात सुरवात केली. ही पदयात्रा पुढं यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. बच्चू कडूंनी मेंढपाळाच्या वेशात खांद्यावर घोंगडी घेत, हातात काठी घेऊन, मेंढपाळाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आज दुसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यातून पदयात्रेला सुरवात केली.
यवतमाळ जिल्ह्यातील लोही, तरनोळी गावात पदयात्रा जात मानकी इथं बच्चू कडूंच्या यात्रेचा दुसरा मुक्काम राहणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पापळ या गावातून यात्रेची सुरवात झाली.
देशातील पहिली शेतकरी आत्महत्या ज्या गावात नोंद झाली त्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावात यात्रेचा समारोप होणार आहे. बच्चू कडूंची ही पदयात्रा सात दिवस चालणार असून यात्रेत एकूण 138 किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.