Ural Police Station Akola. Sarkarnama
विदर्भ

Akola : चार तरुणांचा गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार; मांजरी-कंचनपुरातील घटना

प्रसन्न जकाते

Gun Firing : चार तरुणांनी गस्तीवरील पोलिस पथकाच्या दिशेन हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत मांजरी-कंचनपूर मार्गावर घडली. दुचाकीवरून फिरत असलेल्या चार संशयित तरुणांनी हा गोळीबार केला. हल्लेखोरांच्या गोळीबारात पोलिस थोडक्यात बचावले. घटनेनंतर पोलिस पथकाने आरोपींचा पाठलाग केला, मात्र ते दुचाकीवरून फरार झालेत.

उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हातरूण आणि मांजरी भागात दिनकर इंगळे आणि वाहन चालक मुंडे हे चारचाकी पोलिस वाहनातून गस्त घालत होते. यावेळी कंचनपूरकडून दोन दुचाकी येत होत्या. पोलिसांचे वाहन पाहताच दुचाकीचालक वाहन वळवून पळू लागले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पाठलाग सुरू केला. पोलिस पाठलाग करीत असल्याचे पाहून दुचाकीवरील तरुणांनी पोलीस वाहनाच्या दिशेने हवेत गोळीबार केला.

गोळीबारातील काडतूस पोलिस वाहनाच्या जवळून गेले. गोळीबारात पोलिस थोडक्यात बचावले. त्यानंतरही पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग सुरू ठेवला. मात्र ग्रामीण भागातील रस्ता खराब असल्याने पोलिसांना मात्र लांबपर्यंत दुचाकीचा पाठलाग करता आला नाही. कंचनपूरपर्यंत पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग केला. त्यानंतर दुचाकीस्वार दिसेनासे झालेत. पाठलाग करताना पोलिसांनी बिनतारी संदेश (Wirelss Set) यंत्रणेवरून याप्रकाराची पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तातडीन दहीहांडा पोलिसांनी नाकाबंदी केली. जिल्ह्यातही नाकाबंदी करण्यात आली. मात्र गोळीबार करणाऱ्यांचा सुगावा लागला नाही. याप्रकाराची पोलिसांनी नोंद केली आहे. गोळीबार करणाऱ्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोळीबार करणारे दुचाकीस्वार कोठून येत होते व त्यांचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने आसपासच्या परिसरात दरोडा किंवा चोरीची घटना घडली काय, याची माहिती पोलिसांनी घेतली. परंतु कोणताही सुगावा हाती लागला नाही. त्यामुळे गोळीबार नेमका कशासाठी करण्यात आला, याचा पेच पोलिसांना पडला आहे. कंचनपूरपर्यंत पोलिसांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग केला होता. त्यापुढील भागात नाकाबंदी होती. त्यामुळे मधल्या कोणत्या मार्गावरून दुचाकीस्वार फरार झालेत, याचा कसून शोध घेतला जात आहे.

अकोला पोलिसांवर झालेल्या या गोळीबाराची माहिती शेजारील जिल्ह्याच्या पोलिसांनाही देण्यात आली आहे. अकोल्याला लागून असलेल्या जिल्ह्यातील पोलिसांनीही आरोपींचा शोध सुरू केला आहे. पाठलाग करताना पोलिसांनी दुचाकीचा क्रमांक घेतला होता काय, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. आम्ही हल्लेखोरांचा शोध घेत असून लवकरच आरोपी हाती लागतील, असे पोलिसांनी सांगितले.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT