Food Poisoning Students of Sode School.  Sarkarnama
विदर्भ

Food Poisoning : सोडेतील आश्रमशाळेत आणखी 17 मुलींना विषबाधा; बाधितांची संख्या 123

प्रसन्न जकाते

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील सोडे येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळेतील 17 विद्यार्थिनींना आज (21 डिसेंबर) नव्याने विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. काल (20 डिसेंबर) याच आश्रमशाळेतील 106 मुलींना विषबाधा झाली होती. त्यातील 73 विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर गडचिरोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी सकाळी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना न्याहारी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकएक करीत विद्यार्थिनींची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आश्रमशाळेत खळबळ उडाली. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुन्हा धावाधाव करीत ग्रामस्थांच्या मदतीने विषबाधा झालेल्या मुलींना रुग्णालयात दाखल केले.

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत सोडे गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चालविण्यात येते. येथे आश्रमशाळा आहे. येथे वास्तव्यास असलेल्या 106 विद्यार्थिनींना बुधवारी दुपारचे भोजन केल्यानंतर विषबाधा झाली होती. त्यांना कोबी-बटाटा, वरण, भात, गाजर असे भोजन देण्यात आले होते. गुरुवारी पुन्हा हाच प्रकार घडल्याने आता मात्र विद्यार्थिनी व त्यांचे पालक घाबरले आहेत.

यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले की बुधवारी एकूण 106 विद्यार्थिनींवर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यातील 14 मुलींना उपचारानंतर सोडून दिले. सध्या 40 मुलींवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी आणखी 17 मुलींना धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना डोकेदुखी आणि मळमळ असा त्रास होत आहे. धानोरा येथे सध्या 69 आणि गडचिरोलीत 40 मुलींवर उपचार सुरू आहेत. सर्व मुली या पहिली ते बारावीपर्यंतच्या आहेत. एकूण 109 मुलींवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिकाऱ्यांनी नमूने घेतले

सोडे येथील आश्रमशाळेतील विषबाधेच्या प्रकारानंतर आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी बुधवारपासून रुग्णालय व आश्रमशाळेत तळ ठोकून आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही आश्रमशाळा गाठत तेल व अन्न पदार्थांचे नमूने घेतले आहे. आश्रमशाळेतील पाणी किंवा तेलाच्या माध्यमातून कदाचित ही विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र जोपर्यंत पदार्थाच्या तपासणीचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत ठामपणे नेमकी कशामुळे विषबाधा झाली, हे सांगता येणार नाही, असे आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

(Edited by : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT