Akola News  Sarkarnama
विदर्भ

Akola Ganpati Visarjan: पोलिस बंदोबस्ताशिवाय गणपती विसर्जनाची मिरवणूक; पोलिस निरीक्षकाचा अनोखा प्रयोग

जयेश गावंडे

Akola News : राज्यात आज गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. या मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस बांधव झटत असतात. धार्मिक सण, उत्सवात पोलिसांच्या बंदोबस्ताशिवाय काहीच शक्य नाही. उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येतो.

पण अकोल्यात मात्र बाळापूर येथील गणेश विसर्जन मिरवणूक याला अपवाद ठरली आहे. जिल्ह्यातील बाळापूर शहरात बाप्पांच्या मिरवणुका पोलिस बंदोबस्ताशिवाय पार पडणार आहेत. शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांनी ही जबाबदारी घेतली आहे.

आज अनंत चतुर्दशी असल्याने दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला वाजत-गाजत मिरवणूक काढून सर्वत्र निरोप दिला जातो. उत्सव साजरे करीत असताना या उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. बंदोबस्तादरम्यान पोलिस बांधव डोळ्यांत तेल घालून आपली जबाबदारी पार पाडतात. उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांना दक्ष राहावे लागते.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहर मात्र आज याला अपवाद ठरलं आहे. येथे गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक पोलिस बंदोबस्ताशिवाय पार पडणार आहे. त्यासाठी बाळापूरचे शहर पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांनी पुढाकार घेतला आहे. मिरवणुकीत पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त नसणार आहे. बंदोबस्ताशिवाय विसर्जन मिरवणूक शांतपणे पार पडावी, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

'आमचा बाप्पा' 'आमची मिरवणूक'

बाळापूर शहरात एकूण १७ गणेशोत्सव मंडळ आहेत. हे १७ गणेशोत्सव मंडळे मिरवणुकीत सहभागी होत आहेत. या मिरवणुकीत डीजेवर बंदी घालण्यात आली असून, केवळ पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यात आली आहे, तर गुलालाऐवजी मिरवणुकीत फुलं उधळली जाणार आहेत.

विशेष म्हणजे बंदोबस्त म्हणून एकही पोलिस सहभागी होणार नाही, तर १७ मंडळांचे पाच-पाच कार्यकर्ते हेच बंदोबस्ताची जबाबदारी स्वीकारणार आहेत. बंदोबस्तात सहभागी कार्यकर्ते हे 'टी शर्ट' घालून सहभागी होतील. त्यांच्या टी शर्टवर 'पोलिस मित्र' 'आमचा बाप्पा, आमची मिरवणूक' हे लिहिलेलं आहे. तसं नियोजन पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांनी केलं आहे. त्यांनी गणेश मंडळांची बैठक घेऊन मंडळांना आवाहन केलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT