सहकार क्षेत्रात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी परिवर्तन पॅनेलने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित सहकार पॅनेलसोबत तोडीस तोड मुकाबला केला. सत्ता मिळाली नसली तरी, सहकार पॅनेलने आखलेला एकतर्फी विजयाचा बेत परिवर्तन पॅनेलने अक्षरशः हाणून पाडला.
गोंदिया जिल्हा बँकेच्या 20 संचालकपदांसाठी एकूण 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पगारदार गटातून सहकार पॅनेलचे राजेंद्र जैन आणि वैयक्तिक मतदार गटातून महाविकास आघाडी परिवर्तन पॅनेलचे प्रफुल्ल अग्रवाल या 2 उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील 38 उमेदवारांमधून 18 उमेदवार संचालक म्हणून निवडून द्यायचे होते.
या 18 जागांसाठी 29 जून रोजी जिल्ह्यातील 11 मतदान केंद्रांवर मतदान झाले. 894 मतदारांपैकी 868 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 97 टक्के इतके भरघोस मतदान या निवडणुकीत झाले. 30 जून रोजी मतमोजणी झाली. दोन्ही पॅनेलच्या मातब्बर नेत्यांची धाकधूक अंतिम निकाल लागेपर्यंत कायम होती. याला कारणही तसेच आहे, दोन्ही पॅनेल तोडीस तोड मुकाबला करीत होते.
उल्लेखनीय म्हणजे, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित सहकार पॅनेलने आपला एकतर्फी विजय होईल, अशी व्यूहरचना केली होती. बेत आखला होता. मतदारांना बऱ्यापैकी पर्यटनवारीदेखील करवली होती. त्यामुळे सहकार पॅनेलचा हा बेत खरा ठरतो की काय? अशी चर्चा सहकार क्षेत्रात होती. काही जण एकतर्फी विजय मिळेल, असे बोलत होते.
परंतु, निकालानंतर महाविकास आघाडी समर्थित महाविकास आघाडी परिवर्तन पॅनेलने सहकार पॅनेलचा हा बेत हाणून पाडल्याचे दिसून आले. सहकार पॅनेलच्या मातब्बर नेत्यांनी आखलेल्या व्यूहरचनेवर सत्तेबाहेर असलेल्या महाविकास आघाडी परिवर्तन पॅनेलने चांगली कामगिरी करीत 9 संचालक निवडून आणले. सहकार पॅनेलचे 11 संचालक निवडून आले.
या निकालामुळे नाना पटोले यांना सत्ता मिळाली नसली, तरी शेवटपर्यंत सहकार पॅनेलची धाकधूक वाढविण्यात परिवर्तन पॅनेल यशस्वी झाले, अशीच चर्चा होती. या निवडणुकीत माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्यासह बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, संचालक उषा मेंढे, रेखलाल टेंभरे, राजकुमार कुथे, राजू जैन, गजानन परशुरामकर या दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.