Manohar Chandrapure, Sugat Chandrikare and Others Sarkarnama
विदर्भ

Gondia NCP News : पुत्राच्या घरवापसीने आमदार पित्याचे हात झाले मजबूत !

अभिजीत घोरमारे

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुत्र डॉ. सुगत यांनी 10 नगरसेवकांसह कोहमारा येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) गुरुवारी (ता. 22) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पुत्राच्या आगमनाने आमदार पित्याचे हात मात्र मजबूत झाले आहेत.

डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या घरवापसीने अर्जुनी मोरगाव मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही घरवापसी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 26 मे 2023ला डॉ. सुगत यांनी शिवसेना शिंदे गटात मुंबई येथे प्रवेश केला होता. डॉ. सुगत हे अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष व नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेनेत गेले होते. अवघ्या नऊ महिन्यांतच ते स्वगृही परतले आहेत.

गुरुवारी कोहमारा येथील एरिया 51 येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राकाँचे प्रदेश महासचिव गंगाधर परशुरामकर, सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार, नगरसेवक दानेश साखरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अर्जुनी मोरगावच्या नगराध्यक्ष मंजूषा बारसागडे, सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, बांधकाम सभापती सागर आरेकर, नगरसेविका दीक्षा शहारे, शशी टेंभुर्णे, दीक्षा भगत, कामिनी कोवे, शहिस्ता मतीन शेख, वंदना डोंगरवार, देवचंद तरोणे यांच्यासह डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. सुगत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या स्वगृही परतीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे.

डॉ. सुगत चंद्रिकापुरे व त्यांच्यासह गेलेले 10 नगरसेवक हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये परतले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या परिस्थितीत त्यांची पक्षात झालेली घरवापसी हे विधानसभा निवडणुकीच्या नवीन समीकरणाची नांदी असल्याची चर्चा अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आहे. दुसरीकडे मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुन्हा राष्ट्रवादीचे तिकीट कन्फर्म मानले जात आहे. मुलाच्या पुन्हा घरवापसीने वरिष्ठांचा त्यातही प्रफुल्ल पटेलांचा असलेला दबाव आता आमदार चंदिकापुरेंवर कमी झालेला दिसत आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT