Gondpipri APMC Directors Burning Calendars. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur : काँग्रेसची सटकली; बाजार समितीची दिनदर्शिका आगीत फेकली

Market Committee : भाजपवर व्यक्त केली होती नाराजी; तक्रारही केली दाखल

संदीप रायपूरे

Gondpipri Politics : गोंडपिपरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तेवर असलेल्या भाजपने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचा मुद्दा तापलेलाच आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 2) बाजार समितीच्या या दिनदर्शिकांची होळी केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी बाजार समितीच्या स्थापनेनंतर येथे पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. अशात बाजार समितीत सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. बाजार समितीने नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. ही दिनदर्शिका प्रकाशित होताच काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला. बाजार समितीची दिनदर्शिका भाजपच्या प्रचाराचे माध्यम असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या संचालकानी बाजार समिती आवारात दिनदर्शिकेची होळी केली. संचालक देविदास सातपुते, अशोक रेचनकर, नीलेश संगमवार, प्रेमिला चनेकर, नारायण वागदरकर, संतोष बंडावार यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष राजू झाडे, तुकेश वाणोडे, सारनाथ बक्षी, विनोद नागपुरे, अनिल झाडे, आशिष निमगडे, सरपंच राजू राऊत, प्रा. शंभू येलेकर, साईनाथ कोडापे, बालाजी चानकपुरे, संजय झाडे, अनिल झाडे, साईनाथ बोरकुटे, रमेश जक्कुलवार, धीरेंद्र नागपुरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

काँग्रेसच्या संचालकांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदनही दिले होते. बाजार समितीवर आपली सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेसला होता. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे केवळ सहाच उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे काँग्रेस अद्यापही पराभवाचा धक्का सहन करू शकलेली नाही. अशात त्यांनी सत्ताधारी भाजप संचालकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसला नववर्षाच्या दिनदर्शिकांचा मुद्दा हाती लागला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाजार समितीमधील दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर भाजपच्या नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. नेमकी हिच बाब काँग्रेसला खटकली आहे. दिनदर्शिकेत सभापती, उपसभापतींही फोटो आहेत. भाजप व काँग्रेसमधील संचालकांची नावेदेखील आहेत. मात्र ही नावे विश्वासात न घेता टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारही केली आहे. बाजार समिती पूर्णत: शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांच्या पैशांवर भाजप स्वत:चा प्रचार करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसने स्थानिक आमदाराचा फोटो दिनदर्शिकेतून वगळल्याची टीकाही केली आहे. दिनदर्शिका प्रसिद्ध करताना सत्ताधारी भाजपने राजशिष्टाचार पाळला नाही, असेही काँग्रेसचे म्हणणे आहे. बाजार समितीने यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने आरोग्य शिबिर आयोजित करीत भाजपचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता. बाजार समितीच्या माध्यमातून चाललेल्या पक्षप्रचारावर विरोधकांचा आक्षेप आहे. त्यातूनच विरोधी बाकांवरील संचालकांनी दिनदर्शिकेची होळी केली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT