harshawardhan sapkal on Devendra Fadnavis  Sarkarnama
विदर्भ

Harshvardhan Sapkal On Fadnavis : 'महाबली' फडणवीसांचा त्यांच्या मित्रपक्षांवरच विश्वास नाही..? हर्षवर्धन सपकाळांनी थेट मुद्द्यालाच हात घातला

Congress Sadbhavna Yatra : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दंगल उसळली होती. यास कोण कारणीभूत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र देशात आणि राज्यात सांप्रदायिक विचारांचे सरकार आहे. त्यामुळे कारवाईसुद्धा एकतर्फीच झाली.

Rajesh Charpe

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे अधून मधून भेटत असतात. बंद दाराआड चर्चा करीत असतात. मनसेला महायुतीत घेणार असल्याची चर्चा सुरू आहेत. 3 पक्ष आणि 238 आमदार सोबत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी नवा मित्र जोडण्याची आवश्यकता का वाटते, कशाची भीती वाटते असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना एकतर आपल्या मित्रांवर विश्वास नसावा किंवा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असावी असा अंदाजही सपकाळ यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या सद्‍भवना यात्रेसाठी हर्षवर्धन सपकाळ नागपूरला आले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीला आपणच सर्वाधिक शक्तीमान असल्याचे वाटत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतःला महाबली समजतात. असे असतानाही महायुतीमधील कुरबुरी सुरूच आहेत. त्यामुळे फडणवीस यांना कोणाची शाश्वती वाटत नसावी. याकरिता ते राज ठाकरे यांच्यासोबत वारंवार भेटत असावे आणि त्यांना महायुतीत आणण्याच्या हालचाली करीत असावे असा टोला सपकाळ यांनी लावला.

अजित पवारांची विचारधारा काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचाराशी काही देणेघेणे नाही. सत्तेसाठी त्यांनी तडजोड केली आहे. हे गॅंग ऑफ ट्रिपल इंजिनचे हे सरकार आहे. याच्यात टोळी युद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार हे शाहू फुले आंबेडकर विचारांचे आहेत. ते कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाहीत. महाविकास आघाडी सोबतच राहतील असा विश्वासही यावेळी सपकाळ यांनी व्यक्त केला.

धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न महायुती सरकारने केला. चार्जशिट दाखल झाल्यावर आणि त्यातून काही फोटो बाहेर आल्यावर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. चार्जशिट दाखल होईपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काहीच माहीत नव्हते असे होऊच शकत नाही. लोकांपर्यंत क्रौर्याचे फोटो पोहचल्याने उद्रेक होईल, जाब विचारतील याकरिता महायुती सरकारने मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचा दावा यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केला

फडणवीस हे निष्पक्ष सरकार चालवत नाही...

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दंगल उसळली होती. यास कोण कारणीभूत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र देशात आणि राज्यात सांप्रदायिक विचारांचे सरकार आहे. त्यामुळे कारवाईसुद्धा एकतर्फीच झाली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाही. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निष्पक्ष सरकार चालवत नसल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केला.

काँग्रेसच्या सद्‍भावना यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूरमध्ये घडलेल्या घटनेस फक्त एकाच धर्माच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. फक्त मुस्लिम व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फहीन खानला मुख्य आरोपी करून त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचे घरावरही महापालिकेच्यावतीने बुलडोजर चालवून जमीनदोस्त करण्यात आले आहे. कोर्टाने महापालिकेची कारवाई बेकायदेशीर ठरवली आहे. संपूर्ण कारवाईस स्थगिती दिली आहे. या सर्व घटनाक्रमाचा उल्लेख करून रमेश चेन्निथला यांनी आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या विरुद्ध कारवाई का केली असा सवाल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT