
Shivsena UBT : शाखाप्रमुख, नगरसेवक, महापालिकेत विरोधी पक्षनेता, आमदार, मंत्री आणि चारवेळा सलग खासदार राहिलेल्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे ग्रह फिरले आहेत की काय? अशी काहीसी परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील दुसरे नेते अंबादास दानवे यांच्याशी सातत्याने उडणारे खटके, डावलले जात असल्याची भावना, लोकसभा निवडणुकीत सलग दोनवेळा पराभव असा वातावरणात खैरे स्वतःला असुरक्षित समजू लागले. यातूनच अंबादास दानवे यांच्यावर टीका, आरोप करत चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन तक्रार केली.
खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा मान राखलाच गेला पाहिजे, अशी समज ठाकरेंनी अंबादास दानवे यांना दिली. तर पक्ष अडचणीत असतांना तुमच्यामध्ये वाद नको, ते योग्य नाही, अशी समजूत खैरेंची काढली. यात उद्धव ठाकरेंचे झुकते माप कोणाला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तिकडे नाशिकमध्ये पक्षाच्या शिबीरात मात्र संजय राऊत यांनी चंद्रकांत खैरे यांचे तोंडभरून कौतुक केले. ठाकरेंकडून समजूत अन् राऊतांकडून कौतुक झाल्याने खैरेचे अजूनही पक्षात वजन कायम असल्याचे दिसून आले.
त्याचे झाले असे की, नाशिकमध्ये शिवसेनेचे निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत 'आम्ही इथेच'या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात राजन विचारे, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत,चंद्रकांत खैरे हे सहभागी झाले होते. या नेत्यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेत त्यांच्या शिवसेनेतील प्रवास, संघर्ष आणि राजकारण या विषयावर जाहीर मुलाखत घेतली. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राऊत खैरेंना काय विचारतात? याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
पण संजय राऊत यांनी चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख करतानाच खैरे आलेत, ते हिंदुत्वाचा मूर्तिमंत चेहरा आहेत. त्यांना बघितले तर शंकराचार्यांची आठवण येते, ते शिवसेनेचे शंकराचार्य आहेत. औरंगजेबची कबर आहे, ते तिथून येतात. कडवट शिवसैनिक आहे, असे म्हणत हा कडवटपणा आला कुठून? असा प्रश्न त्यांना केला. यावर मी मार्मिक मुळे शिवसेनेत आहे. वडील मार्मिक वाचायचे त्यामुळे शिवसेनेत आलो. शाखा स्थापन केली.
साहेबांना भेटायचे होते, मला जाऊ देत नव्हते. मी घुसखोरी केली, साहेबांना लोटांगण घातले. साहेबांना बोललो तुम्ही मराठवाड्यात या. ते म्हणाले तुम्ही शिवसेना वाढवा, अशी आठवण खैरे यांनी सांगितली. बाळासाहेब ठाकरे यांची पहिली कौतुकाची थाप कधी पडली? यावर 1988 मध्ये असे उत्तर खैरे यांनी दिले. खैरे यांच्या या छोटेखानी मुलाखतीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. चंद्रकांत खैरे हे धार्मिक वृत्तीचे, पक्षाशी एकनिष्ठ आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.