राजेश चरपे
Ramtek Lok Sabha Constituency : भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीची राज्यात सत्ता आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे राज्यातील सगळीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच अनेक जागांवरून शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरु आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे बोट धरले आहे मात्र, त्यांना भाजप स्वीकारणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. भाजपचे (BJP) कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये यावरून मतभेद आहेत.
भाजप आणि शिवसेनेच्या युतीत रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे (Shivsena) होता. खासदार कृपाल तुमाने दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) बडे नेते म्हणून दिल्लीत ओळख असलेल्या मुकूल वासनिक यांना त्यांनी पराभूत केले. भाजपच्या मदतीशिवाय हा मतदारसंघ जिंकणे शक्य नाही हे शिवसेनेला ठावूक आहे. खासदार तुमाने यांनाही याची जाणीव असल्यानेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बोट धरले आणि शिंदे सेनेत प्रवेश केला.
निवडणूक जवळ आल्याने तुमाने मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाले आहेत. एरवी तुमाने यांची ओळख साधा माणूस अशी आहे. ते फारसे राजकीय वादात पडत नाहीत. मतदारसंघातील जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. इतर नेत्यांप्रमाणे ते कोट्यवधींची घोषणाबाजी करीत नाहीत. आपण बरे आणि आपले काम असे त्यांचे धोरण आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वासोबतही त्यांचे फार सख्य नसल्याचे बोलले जाते.
मतदारसंघात कुरबुरी आणि तक्रारी एकमेकांच्या विरोधात सुरू असतात. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचा एक, शिंदे गटाचा एक आणि भाजपचे दोन आमदार आहेत. हा मतदारसंघ भाजपला हवा आहे. अधून-मधून तशी मागणी करून भाजप खडा टाकून पाहत असते. आपल्या बळावर तुमाने जिंकून येतात. त्यामुळे हा मतदारसंघच आपल्याकडे घेऊन टाका अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. तसे प्रयत्नही केले जात आहे. अनेकांनी उमेदवार बदलाचीही मागणी केली. जागा वाटपाच्या वाटाघाटीच्या वेळी भाजप या जागेसाठी अडून बसू शकते, असेही सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वाटाघाटीच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शब्द कापणार नाहीत, असा दावा केला जात आहे. मात्र, असे झाल्यास तुमाने यांना सामावून घेण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शेवटच्या क्षणी ते भाजपचेही उमेदवार असू शकतात अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भाजपपुढे राज्यातील ४० खासदार निवडूण आणण्याचे मोठे टार्गेट आहे. आपसातील मतभेदांमुळे जागा गमावल्या जाणार नाहीत, याची काळजी भाजपतर्फे घेतल्या जात आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीत धाडसी निर्णय घेणे भाजपच्या अंगलट आले होते. हे बघता यावेळी तीच चूक भाजप करणार नाही असे दिसते. त्यामुळे रामटेकमध्ये विस्तारवादी भाजपची स्थिती 'मजबुरी का नाम...' अशी झाली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.