Ravi Rana- Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Ravi Rana : ‘मी कधीही भाजपत जाणार नाही’; रवी राणांनी धुडकावली बावनकुळेंची ऑफर

Vijaykumar Dudhale

Amravati, 02 September : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची फार इच्छा होती की मी भारतीय जनता पक्षामध्ये यावं. पण मी भाजपमध्ये जाणार नाही, असे आमदार रवी राणा यांनी बावनकुळे यांना तोंडावरच सांगून टाकले. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार राणा हे भाजपच्या ऐवजी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अमरावती रविवारी दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी जोरदार शक्तिप्रर्शन केले. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेही आले होते. त्याच वेळी ही राजकीय जुगलबंदी रंगली होती.

नवनीत राणा (Navneet Rana) यांनी भाजपमध्ये आलं पाहिजे, अशी चंद्रशेखर बावनकुळे यांची इच्छा होती. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या भाजपसोबत आहे आणि भाजप त्यांच्यासोबत आहे. खूप ताकदीने त्या भारतीय जनता पक्षाचे (BJP) काम करीत आहेत, असा दावा आमदार रवी राणा यांनी बोलताना केला.

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना रवी राणा यांनी मीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, असा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आग्रह होता. मात्र, मी कधीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही. मी युवा स्वभिमान पक्षात असून पक्षाचे काम ताकदीने करणार आहे, असे सांगून राणा यांनी भाजप प्रवेशाची ऑफर नाकारली.

नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत राणा यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आमदार रवी राणा हे सावध पावले टाकत असल्याचे दिसून येत आहे.

कारण लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधात लाट दिसून आली आहे, त्यामुळे राणा हे विधानसभेला भाजपपासून चार हात लांब राहण्याचे संकेत देत आहेत.

मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अमरावतीमधून निवडून आल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून त्या कायम लांबच राहिल्या होत्या. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यातूनच त्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती. त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT