Raju Karemore Sarkarnama
विदर्भ

Raju Karemore : भंडाऱ्याचा बिहार करायचा नसेल तर.... : राष्ट्रवादी आमदाराचे तहसीलदारांना खरमरीत पत्र, पत्रात नरबळीचाही उल्लेख

MLA Letter to Thasildar : बीड येथील खंडणीचे प्रकरण सध्या गाजत असताना भंडारा जिल्ह्यातील वाळू माफिया आणि अधिकाऱ्यांचे संबंध मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या पत्रातून उघड झाले आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 15 March : बीड येथील खंडणीचे प्रकरण सध्या गाजत असताना भंडारा जिल्ह्यातील वाळू माफिया आणि अधिकाऱ्यांचे संबंध मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या पत्रातून उघड झाले आहे. भंडारा जिल्ह्याला बिहार करायचे नसेल तर हे अवैध धंदे त्वरित बंद करण्याचे आदेश या आमदाराने लेखीपत्राद्वारे मोहाडीच्या तहसीलदारांना दिले आहेत. या पत्रात त्यांनी कोणाकोणाला हप्ते द्यावे लागतात, याचाही उल्लेख केला असल्याने सध्या या पत्राची भंडारा जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

राजू कारेमोरे (Raju Karemore) हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते अजित पवार गटात आहे. महायुतीची सत्ता असताना आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असतानाही अधिकारी त्यांना विचारलेली माहिती देत नाहीत, शासनादेशाची प्रत देत नाहीत, असे त्यांच्या पत्रातून दिसत आहे.

अधिकाऱ्यांच्या यंत्रणेसमोर आमदारही हतबल असल्याचेही यातून दिसून येते. आमदार कारेमोरे यांनी अवैधरित्या सुरू असलेली वाळू, मॅग्निज, गौण खनिजाची अवैध वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी मोहाडीच्या (Mohadi) तहसीलदारांकडे पत्रातून केली आहे.

आमदार कारेमोरे यांनी पत्रात म्हटले आहे की, भंडारा जिल्ह्यातील ज्या ठेकेदारांनी वाळू घाट तसेच डेपो घेतले आहेत, ते अवैधपणे चालवात आहेत. संपूर्ण घाट हे खनिज अधिकारी, कर्मचारी व आपण व आपले चेलेचपाटे चालवात आहेत. जनसामान्यांमध्ये अशी चर्चासुद्धा आहे.

घाट चालवताना कोतवालापासून जिल्हाधिकारी, महसूलमंत्री व खनिकर्म मंत्री यांच्यापर्यंत तसेच पोलिस शिपायापासून तर पोलिस अधीक्षक, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना देणेघेणे करण्यात येते. त्यामुळे कोणीच आमचा बाल बाका करू शकत नाहीत, असे आपले चेलेचपाटे जनतेमध्ये सांगत असल्याने जनप्रतिनिधींची जनतेमध्ये खूप बदनामी होत आहे.

काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात हे अवैध काम चालत आहे, त्यामुळे विधानसभा मतदारसंघात मोठी दहशत निर्माण झाली आहे. एका मुलाचा रेतीघाटावर नरबळी दिल्याचीसुद्धा चर्चा आहे. आपणास सरकारच्या जीआरची मागणी केली असता आपण देत नाही. वाळू घाटांबाबतचीसुद्धा माहिती दिली नाही. जनप्रतिनिधींच्या आदेशाची अवहेलना आपण केली आहे.

शासनाच्या वाळू धोरणाचे व डेपा चालवण्याचे जे काही जीआर निघाले आहेत, त्याची संपूर्ण माहिती माझ्या कार्यालयात द्यावी. भंडारा जिल्हा आणि मोहाडी विधानसभा मतदारसंघाला बिहार बनवायचे नसेल, तर आपण वरील गैरप्रकार त्वरित थांबावावे. जर भविष्यात काही अप्रिय घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असा इशाराही आमदार कारेमोरे यांनी तहसीलादारांना पत्राद्वारे दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT