Nagpur Political News : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची नसलेली शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना वाद घालण्यापलीकडे कोणतंही काम आता शिल्लक राहिलेलं नाही. सतत वाद घालणं हेच त्यांना ठाऊक आहे. तसंही वाद आणि ठाकरे सेना यांचं अत्यंत जवळचं नातं आहे, असा खोचक टोला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला.
विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले सामंत यांचं गुरुवारी (ता. २३) नागपूर येथे आगमन झालं. त्यावेळी ते बोलत होते. सामंत यांनी या वेळी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आता कोणतीही पदं यांच्याजवळ नाहीत. कोणतंही काम शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळं सतत कोणते ना कोणते वाद उकरणं एवढच काम त्यांना आता उरलंय असे ते म्हणाले. (Industry Minister & Eknath Shinde's Group Leader Uday Samant Criticized Shiv Sena Uddhav Thackeray From Nagpur)
आमदार आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात येत असल्याचं कळलंय. त्यांना मी मतदारसंघात येण्यासाठी शुभेच्छा देतो. ते तिकडे आपल्या मतदारसंघात फिरणार आहेत, तर आपण उपराजधानी नागपुरात कामात व्यस्त असल्याची मिश्किल टिप्पणी सामंत यांनी केली.
ठाकरे गट सातत्यानं आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर भाष्य करीत आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांचं मुख्यमंत्री पद गेलंय. त्यात नवीन काहीच नाही. परंतु मंत्रिपदी गेल्यामुळं काही लोकांना निव्वळ आमची बदनामी करणं सुरू केलंय. गद्दार आणि खोके यांना विधिमंडळात सुरू असलेल्या सुनावणीमुळं ‘फूलस्टॉप’ मिळालाय, असं सामंत यांनी सांगितलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू हे आपले चांगले सहकारी मित्र आहेत . गुवाहाटीला सोबत असताना आम्ही सर्व आनंदात होतो. सध्या ते कोणत्या मुद्द्यांवर काय बोलत आहेत व का बोलत आहेत, यासंदर्भात त्यांनाच माहिती आहे. आपण लवकरच त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरवण्याचं कामगार सल्लागार समिती करते. अधिवेशनाच्या कालावधीबाबत समितीच्या बैठकीत निर्णय होईल, असं वाटते. आमदार अपात्रतेचा आणि विधानसभा अधिवेशनाचा आपसात कोणताही संबंध नाही. हिवाळी अधिवेशन ज्या पद्धतीनं नेहमी नागपूरला होतं, त्याच पद्धतीने होणार आहे. अधिवेशनात राज्यातील व विशेषत: विदर्भातील उद्योगांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामंत म्हणाले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून गडचिरोलीमध्ये मोठी गुंतवणूक होणार आहे. या कामांचा आढावाही घेणार आहे. गेल्या अधिवेशनात सरकारने श्वेतपत्रिका काढली होती. ज्या तीन प्रकल्पांबाबत आरडाओरड सुरू होती, ते प्रकल्प आमच्या सत्ताकाळातील नाहीत हे श्वेतपत्रिकेत सिद्ध झालं. यानंतरही कुणाजवळ पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे. आमच्या कार्यकाळात कोणतेही प्रकल्प राज्याबाहेर गेले नाही, असं आता सिद्ध झाल्याचं सामंत यांनी नमूद केलं.
मराठा आरक्षणाबात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मराठा समाजाला नक्की मिळले. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीही त्यांचे काम करीत आहे. ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, हे कळलं. पण त्यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची कल्पना नाही. ओबीसींवर अन्याय होईल, असं कोणतंही काम सरकार करणार नाही हे मात्र आपण निश्चितपणे सांगत आहोत, असं सामंत म्हणाले.
Edited by : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.