IPS Sandip Patil & Ankit Goyal Sarkarnama
विदर्भ

IPS Transfer : होय! अंकित गोयल तेच ज्यांनी मिलिंद तेलतुंबडेंसह 26 माओवाद्यांचा खात्मा केला!

Maharashtra Government : संदीप पाटलांसह गाजविला गडचिरोलीतील कार्यकाळ

प्रसन्न जकाते

Gadchiroli News : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाचे बुधवारी (ता. 31) काढले. या बदली आदेशांमध्ये गडचिरोलीत कार्यकाळ गाजविलेल्या दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहिले आहेत गडचिरोली परीक्षेत्राचे उपमहानिरीक्षक (DIG) संदीप पाटील आणि दुसरे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल.

एकेकाळी गडचिरोलीच्या पोलिस अधीक्षकपदाचा कार्यकाळ गाजविणारे संदीप पाटील यांना आता सरकारने नक्षल विरोधी अभियानाच्या महानिरीक्षक (IG) पदाची धुरा सोपविली आहे. पाटील यांच्या सोबतीला सरकारने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना नागपुरात गडचिरोली परीक्षेत्राचे उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर पाठविले आहे.

अंकित गोयल यांनी गडचिरोलीत पोलिस अधीक्षक असताना देशातील सगळ्यात मोठे नक्षल एन्काऊंटर केले होते. या चकमकीत कोरेगाव भीमा दंगलीतील प्रमुख संशयित माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह तब्बल 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले होते.

मर्दीनटोलाच्या जंगलातील या चकमकीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. महाविकास आघाडी सरकारने या चकमकीसाठी अंकित गोयल यांची पाठ थोपटली होती. केंद्र सरकारनेही गोयल यांचे या कारवाईसाठी कौतुक केले होते.

मर्दीनटोलाची चकमक झाली, त्यावेळी संदीप पाटील हे गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) होते. नक्षल भागात संदीप पाटील यांचे जबरदस्त ‘इन्फर्मेशन नेटवर्क’ आहे. त्यामुळेच कदाचित सरकारने त्यांना याच विभागाची पूर्णवेळ जबाबदारी सोपविली आहे.

आता संदीप पाटील यांना नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक (IG) केल्याने सरकार शहरी नक्षलवादाविरुद्ध मोहिम तीव्र करणार असल्याचे संकेत आहेत. अशात पाटील यांच्या मदतीसाठी सरकारने गोयल यांना पाठविले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असाही योगायोग

गडचिरोलीतून पोलिस अधीक्षक पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर संदीप पाटील यांची बदली पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी झाली होती. कोविड काळात पाटील यांनी पुण्यात जबरदस्त काम करून दाखविले.

सुमारे एक हजारावर गुन्हेगारांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. अशात त्यांची पदोन्नती झाली आणि त्यांना पुण्यातून पुन्हा गडचिरोलीत पाठविण्यात आले. असाच योगायोग आयपीएस अंकित गोयल यांच्याबाबतही घडला आहे.

अंकित गोयल यांचा गडचिरोली पोलिस अधीक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनाही पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. पुण्यात गोयले यांचा कार्यकाळ सुरळीत सुरू असतानाच 1 वर्ष 3 महिन्यात त्यांनाही पदोन्नती देत गडचिरोली परीक्षेत्राचे डीआयजी करण्यात आले आहे. त्यामुळे गडचिरोलीत कार्यकाळ गाजविणाऱ्या दोन्ही आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग व्हाया पुणे ठरल्याची पोलिस वर्तुळात चर्चा आहे.

कोण आहेत मिलिंद तेलतुंबडे?

कोरगाव भीमा येथील एल्गार परिषेदेनंतर राज्यात हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराचे नक्षल कनेक्शन असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. पुणे पोलिस आणि त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) याप्रकरणी कारवाई केली होती.

यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी) केंद्रीय सदस्य मिलिंद तेलतुंबडे याच्यावर आरोप होते. कालांतराने मिलिंद गडचिरोलीतील मर्दीनटोला नक्षल चकमकीत ठार झाले.

मिलिंद यांचे बंधू प्रा. आनंद तेलतुंबडे यांनाही राष्ट्रीय तपास यंत्रणेने याप्रकरणी अटक केली होती. आनंद यांना अलीकडेच कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्याचा सर्वोच सन्मान देत पुरस्कृत केले. साहित्य, सामाजिक न्याय आणि सलोख्यासाठी प्रा. आनंद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT