Ankit Goyal : गडचिरोलीमध्ये आपला कार्यकाळ गाजविणारे आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांचा 458 दिवसांच्या खंडानंतर मुक्काम पुन्हा गडचिरोलीत असणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीत पोलिस अधीक्षक असलेल्या अंकित गोयल यांची ऑक्टोबर 2022 मध्ये पुण्यात बदली झाली होती. पुण्यामध्ये गोयल यांची कारकीर्द व्यवस्थित सुरू असतानाच राज्यभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली यादीत त्यांचाही क्रमांक लागला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना गोयल हे पुण्यात गेले होते. त्यानंतर ठाकरे सरकारचे पतन झाले. महायुतीचे सरकार सत्तेवर आले. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संधान साधून असलेल्या अंकित गोयल यांना पुन्हा विदर्भाचा रस्ता दाखविण्यात आला आहे. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री म्हणून जबाबदारी आहे. अजित पवारही उपमुख्यमंत्री आहेत. सत्तेचे वारे बदल्यानंतर घड्याळीचे काटे फिरले व गोयल यांचा बुधवारी (ता. 31) राज्यभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली यादीत समावेश झाला.
पुणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक पदावरून त्यांना सरकारने पदोन्नती देत पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) केले आणि पुन्हा थेट गडचिरोलीच्या दिशेने पाठविले. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना पदोन्नती देत सरकारने नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक केले. त्यांना नागपुरातल्या नागपुरात पदोन्नती मिळाली. पाटील यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागेवर मात्र गोयल यांना पाठविण्यात आले.
सरकारने केलेल्या या बदलीमुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागातून पुण्यासारख्या आलीशान शहरात गेलेल्या गोयल यांना पुन्हा एकदा त्याच भागात काम करावे लागणार आहे. गडचिरोलीत कार्यरत असताना मर्दीनटोला येथील चकमक आयपीएस अंकित गोयल यांच्याच कार्यकाळात झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने विशेषत: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोयल यांची पाठ थोपटली होती. केंद्रानेही त्यांना शाबासकी दिली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संदीप पाटील हे त्यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक होते. संदीप पाटील यांचा गडचिरोलीतील अनुभव आणि अंकित गोयल यांची काम करण्याची पद्धत यामुळेच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील माओवादी कारवायांवर अंकुश ठेवण्यात सरकारला यश आले होते. अशात पुण्यातून गोयल यांना पुन्हा याच क्षेत्राची पदोन्नतीवर जबाबदारी देण्यामागे नक्कीच सरकारचा मोठा हेतू असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आयपीएस अंकित गोयल यांच्या पुण्यातून गडचिरोलीतील बदलीमागे त्यांनी मर्दीनटोलाच्या चकमकीत मिळविलेले यश आहे की राजकारण यावर सध्या पोलिस वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.