Jayant Patil Meeting with Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गुप्त भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावल्या जात आहेत. जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना सुद्धा आता अधिकच जोर चढला आहे. या सर्व घडामोडी आणि चर्चांवर आता बावनकुळे यांनी स्वतःच खुलासा केला आहे.
जयंत पाटील(Jaynt Patil) आणि आपली भेट झाली असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मात्र या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ते सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित विषय घेऊन आपणास भेटायला आले होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा उपस्थित होते असे त्यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील यांनी महसूल विभागाशी संबंधित सुमारे १४ ते १५ विषय आपल्यासमोर ठेवले. असं बावनकुळेंनी सांगितलं.
याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या विकास कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. येत्या अधिवेशानात त्यांच्या सर्व विषयावर माझ्या दालनात बैठक घेऊन ते सोडवण्याचे आश्वासन त्यांना दिले असल्याचे बावनकुळे म्हणाले. सोमवारी संध्याकाळी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान माझ्या अधिकृत बंगल्यावर ते भेटायला आले होते. मात्र एकटे नव्हते सुमारे ४०० ते ५०० लोक या ठिकाणी होते. ही राजकीय भेट नव्हती कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. फक्त विकास कामांवर चर्चा झाली. अशी माहिती बावनकुळेंनी दिली.
जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावे मी एवढा मोठा नसल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खुलास्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उडालेला धुरळा खाली बसणार असला तरी जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी भाजप(BJP) नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. तेव्हासुद्धा अशाच चर्चांना ऊत आला आहे. त्यामुळे मोठी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
शक्तीपीठ महामार्गाला सध्या मोठा विरोध सुरू आहे. विशेषतः कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी मार्गासाठी जागा देण्यास ठाम नकार दिला आहे. काँग्रेसने(Congress) या विरोधात आंदोलन पुकारले आहे. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती. महायुतीचे सरकार स्थापन होताच पुन्हा शक्तीपीठ महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
याबाबत बावनकुळे म्हणाले, महसूलमंत्री म्हणून ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, त्या दुरुस्त करून दूर केल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सरकार सोडवेल, काम होणे महत्त्वाचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.