Vidhan Bhavan : राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्याचा चवथा दिवस फोटो सेशनच्या मुद्द्यावरून गाजला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्री यावेळी अनुपस्थित होते. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी विधान सभेत या विषयावरून ‘फोटो फ्रेम’ऐवजी सरकारलाच भिंतीवर टांगलं.
हिवाळी अधिवेशनात सहभागी होणाऱ्या मंत्री व आमदारांचे एकत्रित छायाचित्र काढण्यात येते. दरवर्षीची ही प्रथा आहे. यंदा गुरुवारी फोटो सेशन करण्यात आलं. परंतु बहुतांश मंत्री, आमदारांना विधान भवनातील अधिकाऱ्यांनी निरोपच दिला नाही. त्यामुळं फोटो काढण्यावरून बहुतांश सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. जयंत पाटील यांनी या नाराज आमदारांच्यावतीनं सभागृहात निवेदन केलं.
पाटील म्हणाले आपण गेली सात टर्म सभागृहात आमदार आहोत. 1990 पासून कधीही फोटो सेशनच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनुपस्थित राहिले किंवा विलंबाने आले असं झालेलं नाही. विधान भवनातील अधिकाऱ्यांनी मंत्री व आमदारांच्या ज्येष्ठता क्रमानुसार बैठक व्यवस्था करायला हवी होती. परंतु तसं झालं नाही. त्यामुळं पहिल्यांदाच सभागृहात आलेले आमदार समोरच्या रांगेत आणि सात ते आठ टर्म झालेले आमदार व पक्षांमधील ज्येष्ठ नेते शेवटच्या ओळीत असा प्रकार घडला. 15 मिनिटांपर्यंत आमदार फोटोसाठी उभे होते. परंतु फोटो काढणारा गायब होता.
बाळासाहेब थोरात हे सभागृहातील सर्वांत ज्येष्ठ आमदारांपैकी एक आहेत. परंतु त्यांनाही योग्य वागणूक मिळाली नाही, अशी तक्रार पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य अनुपस्थित राहिल्यानं हे केवळ आमदारांचं फोटोसेशन ठरलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील यावेळी आले नाहीत, याकडं पाटील यांनी लक्ष वेधलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभेवर वर्चस्व कुणाचं? अध्यक्ष या नात्याने राहुल नार्वेकर यांचं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं असा बोचरा सवालही जयंत पाटील यांनी केला. विरोधी पक्षातील आमदारांना बुधवारी (ता. 13) स्नेहभोजन देण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आपण भोजन घेतलं त्यामुळं सभागृहात आपण अधिक कडू बोलणार नाही, अशी चपखल टीप्पणी पाटील यांनी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हसत उत्तर दिलं. नार्वेकर म्हणाले की, ‘जयंत पाटील यांनी कालच्या जेवणात स्वीट घेतलं नाही. त्यानंतरही ते सभागृहात इतकं गोड बोललं त्याबद्दल आभार.’
फोटोसेशनवरून जयंत पाटील यांनी सरकारला घेतल्यानंतर दुसऱ्या बाजुचा मोर्चा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सांभाळला. मुख्यमंत्री आले नाहीत हे एकदा समजता येईल. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत, हे अनाकलनीय असल्याचं पटोले म्हणाले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सध्या मुख्यमंत्री होण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. अशात मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामीच होती. दोन्हीपैकी एका उपमुख्यमंत्र्याना सीएमच्या खुर्चीत बसवून द्यायचे असते असा टोलाही त्यांनी हाणला.
पटोले यांनी सीएमच्या खुर्चीचा मुद्दा काढताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उभं राहात तात्काळ त्यांनी प्रत्युत्तर दिलं. सीएमची खुर्ची तुमच्यासाठीच रिकामी ठेवली होती. ती यासाठी की तशी ती खुर्ची मिळणार नाहीये, किमान फोटोत तरी बसून घ्या, असा चपखल टोला फडणवीस यांनी पटोलेंना लगावला. त्यामुळं सभागृहात हंशा पिकला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.