नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा माणूस दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर होता. आपल्या महात्म्यांच्या बाबतीत अनुद्गार काढणारे नेते भजपत आहेत, त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. आपल्या मातीतील राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महाराष्ट्र सदनातून पुतळे हटवण्यात आले. आपला बहुजन समाज सरकारचा निषेध करायला लागला, त्याचा धसका घेऊन घाईघाईत अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्यात आले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. (Jayant Patil said Shinde-Fadnavis hastily decided to change the name of Nagar because....)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) ओबीसी मेळाव्याचे नागपूरमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी आयोग नेमला होता. मात्र, खोके सरकारने सत्तापालट केले, तरीही भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी प्रयत्न सोडलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. जातीनिहाय जनगणना करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. मात्र, भाजप जनगणना करायचे टाळत आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री पाटील म्हणाले की, देशातील विरोधकांना संपवायचा प्रयत्न भाजपने केला आहे. ओबीसी समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे समाजकारण हे बहुजन समाजाच्या हिताचे आहे. जीवाचे रान करून भाजप मोठा करणारे एकनाथ खडसे यांची पक्षात कोंडी करण्यात आली. शेवटी त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणे पसंत केले. स्वतःच्या पक्षातील ओबीसी नेत्यांवरही त्यांनी अन्याय केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख असो अथवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीशी, शरद पवारावर निष्ठा कायम ठेवली. नेतृत्वावर दृढ विश्वास ही आपली खरी ताकद आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.