Gautami Patil & Juhi Sherkar. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : गौतमीनंतर आता लावणी सम्राज्ञी जुहीचा राजकारण्यांना नाद

अभिजीत घोरमारे

Lok Sabha Election 2024 : राजकारणी लोकांच्या आवडीत कधी बदल घडेल याचा नेम नाही. एकेकाळी आपल्या कार्यक्रमात गर्दी खेचण्यासाठी लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलला विदर्भात सर्वाधिक कार्यक्रमांमध्ये बोलावले जायचे. आता मात्र बैलगाडा फेम जुही शेरकरला राजकीय नेत्यांची लावणीच्या कार्यक्रमासाठी पसंती दिली जात आहे. विदर्भात राजकीय पटलावर जुही शेरकरचे कार्यक्रम अधिक वाढल्याने गौतमी पाटील मागे पडल्या आहेत. आता विदर्भातील राजकारणाला बैलगाडा फेम जुही शेरकरचा नाद नेत्यांना लागलाय अशी चर्चा होत आहे.

पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही राजकीय नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंडई, सांस्कृतिक कार्यक्रम, लावणीनृत्य यांचा आधार घेतला जातो. जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येतो या कार्यक्रमांची संख्या वाढत जाते. अगदी ग्रामपंचायतीच्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतचे राजकारण करणारे नेतेही अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. मंडई आणि नृत्य कार्यक्रम हा या भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. त्यामुळे सध्या पूर्व विदर्भात लावणी नृत्याचे कार्यक्रम होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एखादा राजकीय कार्यक्रम घ्यायचा ठरला, तर त्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी जमविणे नेत्यांसाठी जिकरीचे ठरते. त्यामुळे भंडाऱ्यात गर्दी खेचण्यासाठी सोपा मार्ग म्हणून लावणी-ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यातही गौतमी पाटीलच्या नृत्याची मागणी राजकीय नेत्यांचा व्यासपीठावर अधिक आहे. गौतमी पाटिलचा ‘फॅन फॉलोइंग’ अधिक असल्याने एका मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी एकट्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर गर्दी असते. हे पाहता राजकीय सभेच्या कार्यक्रमस्थळी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम हमखास असायचा.

आता मात्र विदर्भातील लोकांनी गौतमीपेक्षा विदर्भातीलीच लावणी सम्राज्ञी बैलगाडा फेम जुही शेरकरला अचानक आपल्या कार्यक्रमात प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विदर्भाच्या राजकीय व्यासपीठावरून गौतमी पाटील ‘आउट’ आणि जुही शेळकर ‘इन’ झाली आहे. याचे कारणही राजकीय जाणकार देऊ लागलेले आहे. गौतमी पाटील आणि गोंधळ याचे समीकरण मानले जात आहे. गौतमी पाटीलचा असा कोणताही नृत्य कार्यक्रम नाही, ज्यात गोंधळ उडाला नाही. क्वचित एखादा कार्यक्रम सोडला तर सर्वच कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे दिसते. याशिवाय अशा कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.

गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान आयोजकावर गुन्हे नोंदविण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे अनेक नेते वादात अडकले आहेत. भंडारा जिल्ह्यातही गौतमी पाटीलच्या पहिल्या कार्यक्रमादरम्यान आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. गौतमीचा कार्यक्रम अधिक खर्चिक आहे. त्यामुळे गौतमीला बोलवून कायद्याच्या कचाटा स्वतःला कशासाठी अडकवून घ्यायचे, असा विचार केला जात आहे. भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील नेत्यांना त्यामुळे गौतमीचे कार्यक्रम आयोजित करण्यात रस उरलेला दिसत नाही. या सर्व अडचणी लक्षात घेता विदर्भातील राजकीय नेत्यांनी आता आपला व्यासपीठावर विदर्भातीलच जुही शेरकरला स्थान देण्यास सुरुवात केली आहे.

जुही शेरकरचा ‘फॅन फॉलोइंग’ही बऱ्यापैकी आहे. गौतमीप्रमाणेच तिच्या नृत्याचेही अनेक दिवाने आहेत. याशिवाय तिच्या लावणीचा कार्यक्रमात सध्यातरी गोंधळाशिवाय सुरळीत पार पडत असल्याने आपल्या नावावर डाग लागणार नाही, असे राजकीय नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे आता विदर्भातील नेत्यांनी लावणी नृत्यांच्या कार्यक्रमासाठी जुही शेरकरलाच पसंती देणे सुरू केले आहे. परिणामी गौतमीपेक्षा जुहीच्या उत्पन्नात भर पडली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT