Politics in Akola NCP. Sarkarnama
विदर्भ

NCP Politics : अकोल्यात अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘लेटरबॉम्ब वॉर’

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आता हे युद्ध ‘लेटरबॉम्ब’वर पोहचले आहे. ‘लेटरबॉम्ब’मध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. संदीप पाटील यांनी आयोजित केलेल्या एका बैठकीवरून जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे आणि संदीप पाटील यांनी एकमेकांना पत्र पाठवत आरोप प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील धुसफूस वाढली आहे.

अगोदरच अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटातटात विभागाला गेला होता. राष्ट्रवादीत ‘दादा’ गट आणि ‘साहेब’ गट हे दोन गट पडल्यानंतरही ही गटबाजी कायम आहे. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्यातील गटबाजी अनेकदा उफाळून आली आहे. वर्चस्वाच्या लढाईतून आमदार मिटकरी आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे.

शिवसेना गटातून बाहेर निघत संदीप पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर दोन गटातील गटबाजी वारंवार उफाळून येऊ लागली आहे. संदीप पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी (ता. 3) बाळापूर येथे आयोजित करण्यात आली. याबैठकीवर आक्षेप घेत जिल्हाध्यक्ष अंधारे यांनी संदीप पाटील यांना पत्र पाठविले आहे. दुसरीकडे पाटील यांनीही अंधारे यांना पत्र पाठवून प्रत्युत्तर दिले आहे. दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. दोघांच्या या ‘लेटरबॉम्ब’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पुन्हा एकदा वादाची मालिका सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. आगामी काळात हा वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.

संदीप पाटील यांनी 3 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर जिल्हाध्यक्ष अंधारे यांनी आक्षेप घेत. ही बैठक रद्द करण्याची मागणी केली. अगोदर पक्षाची ध्येयधोरणे समजून घ्या. आठ दिवसांतच ‘फालतू’ लोकांच्या नादी लागून पक्षामध्ये दुही माजवत असल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी पत्रात केला आहे. पक्षप्रवेश झाल्यानंतर आपल्याशी संपर्क करणे क्रमप्राप्त होते. मात्र पाटील यांनी संपर्क केला नसल्याचे अंधारे यांचे म्हणणे आहे. बैठक घेण्याचा अधिकार हा पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा असतो. ही बैठक रद्द करण्याची मागणी अंधारे यांनी पत्रातून केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंधारे यांच्या पत्रावर प्रत्युत्तर देताना संदीप पाटील यांनीही अनेक मुद्दे लिहिले आहेत. संदीप पाटील म्हणतात, आपला पक्षप्रवेश हा केवळ प्रवेश नसून घरवापसी आहे. आपल्याला स्वागतासाठी बोलविण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला. मात्र अंधारे यांनी प्रवेशाला सुरुवाती पासूनच विरोध केल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. आपण पक्षाचे कार्यकर्ता असून 3 फेब्रुवारीची बैठक ही कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित केली आहे. या बैठकीत आमदार अमोला मिटकरी हे सर्वांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यासाठी ही बैठक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

आमदार अमोल मिटकरी यांच्या संदर्भात आपण टाकलेला ‘फालतू’ शब्द यामुळे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीची किव येत असून त्याचा निषेध संदीप पाटील यांनी पत्रातून नोंदविला आहे. पक्ष बांधणीसाठी ही बैठक असून ती होणारच असेही स्पष्टीकरण संदीप पाटील यांनी पत्रातून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील गटबाजी या ‘लेटरबॉम्ब’मुळे पुन्हा एकदा उफाळून आली आहे. एकीकडे जिल्हाध्यक्ष अंधारे यांच्याकडून संदीप पाटील यांच्या बैठकीला विरोध करत आहेत, तर दुसरीकडे संदीप पाटील हे बैठक घेण्यावर ठाम आहेत.

अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटातील वाद भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार अमोला मिटकरी विरुद्ध जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे असा सामना अकोल्यात रंगण्याची शक्यता आहे. शिवा मोहोड यांच्या पक्षप्रवेशापासून वाढलेली ही गटबाजी आता संदीप पाटील यांच्या प्रवेशानंतरही सुरूच आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT