Dispute Raised in Akola : शिवसेना एकनाथ शिंदे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करीत संदीप पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पाटलांचा हा प्रवेश आमदार अमोल मिटकरी यांनी घडवून आणला. संदीप पाटील यांना पक्षात आणण्यासाठी आमदार मिटकरी यांनी प्रयत्न केले. संदीप पाटील यांच्या पक्ष प्रवेशातून मिटकरींनी अकोल्याचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे ‘गेम’ केल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली. ‘साहेब’ आणि ‘दादांच्या’ दोन्ही वेगळ्या गटात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही विभाजन झाले. अकोला जिल्ह्यातही अशीच परिस्थिती झाली. साहेबांना मानणारा वर्ग साहेबांसोबत गेला तर दादांचा समर्थक हा दादांसोबत. जिल्ह्यात अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटातटात विभागला गेला होता. दोन गट पडल्यानंतरही ही गटबाजी कायम आहे.
जिल्ह्यात सरकारसोबत गेलेल्या अजित पवार गटामध्येच अंतर्गत अनेक गट निर्माण झाले आहेत. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्यातील गटबाजी अनेकदा उफाळून आली आहे. वर्चस्वाच्या लढाईतून आमदार मिटकरी आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. त्यामुळेच ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी मिटकरींनी नव्या चेहऱ्याचा शोध घेतल्याचे दिसत आहे.
शिवसेना शिंदे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करीत संदीप पाटील यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेतला. हा प्रवेश घडवून आणण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. पाटील यांच्या प्रवेशानंतर पक्षातील वाद आणखी विकोपाला जाताना दिसत आहे. पाटील यांच्या पक्ष प्रवेशांनतर त्यांच्या स्वागताला अंधारे आलेच नाहीत. आपल्याला प्रवेश सोहळ्याबद्दल माहिती नव्हती, असे अंधारे यांचे म्हणणे होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे पाटील यांचा पक्षप्रवेश हा बाळापूर -पातूर मतदारसंघाच्या राजकीय समीकरणातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच मतदारसंघासाठी कृष्णा अंधारे इच्छुक होते. पाटील यांच्या पक्ष प्रवेश कृष्णा अंधारे यांना या मतदारसंघातून बाजूला सारण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा डाव आमदार अमोल मिटकरींनीच आखल्याची राष्ट्रवादीच्या गटातून सांगण्यात येत आहे.
संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर पाटील यांच्याकडे कोणतीही जबाबदारी अद्यापही देण्यात आलेली नाही. प्रवेशामुळे पुन्हा एकदा मिटकरींनी अंधारेंना डिवचल्याची सांगण्यात येत आहे. मिटकरी यांचे कट्टर विरोधक शिवा मोहोड यांना पक्षात आणण्यासाठी पूर्वी अंधारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता मोहोड आणि अंधारे यांच्या शहाला काटशह देण्यासारूठी बदला म्हणून मिटकरींनीही पाटील यांच्या प्रवेशासाठी मोलाची भूमिका बजावली.
ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांना डावलण्यासाठी अमोल मिटकरी वेगवेगळी खेळी खेळत आहेत. पाटलांचा पक्षप्रवेश हा राजकारणाच्या सारीपाटावरील एक ‘चाल’ आहे. आता या गटाचा पुढचा ‘डाव’ हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद असल्याचे सांगितले जात आहे. संदीप पाटील यांची या पदावर वर्णी लावण्यासाठी आमदार मिटकरी प्रयत्न करू शकतात. त्यामुळेच पाटील यांना लवकरच पक्षात मोठे पद मिळणार, असे सांगण्यात येत आहे. संदीप पाटील हे पक्षात आल्याने मिटकरींचा गट मजबूत झाला आहे. भविष्यात अजित पवार गटात आणखी कोणत्या घडामोडी घडतात. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.