Akola Lok Sabha Constituency  Sarkarnama
विदर्भ

Akola Lok Sabha Constituency Election 2024 :अकोल्यात प्रकाश आंबेडकर खासदारकीपासून 'वंचित' !

Mahavikas Aaghadi Leading in Akola Constituency : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना आत्तापर्यंत 81,188 एवढी मते मिळाली असून सहाव्या फेरी अखेर 63 हजार मतांनी आंबेडकर पिछाडीवर आहेत.  

योगेश फरपट

Akola Lok Sabha 2024 Results LIVE : विदर्भातील अंत्यंत लक्षवेधी ठरलेल्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झालेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीच्या उमेदवाराने जोरदार आघाडी घेतली आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील हे आघाडीवर असल्याचे दिसून आले.

सातव्या फेरी अखेर डॉ. अभय पाटील यांना एक लाख 27,493 मते मिळाली असून भाजपचे अनुप धोत्रे यांना 1,13,292 एवढी मते मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना 81,188 एवढी मते मिळाली असून आतापर्यंत सहाव्या फेरी अखेर 63 हजार मतांनी आंबेडकर पिछाडीवर आहेत.  

अकोला लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. यापूर्वीच्या 2004, ते 2019 अशा चार निवडणूकांमध्ये दणदणीत विजय मिळवत भाजपाचे खासदार संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेचा गड कायम ठेवण्यात यश मिळवले होते. त्यांचे सुपूत्र अनुप धोत्रे व डॉ.अभय पाटील व अडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या तिहेरी लढत अकोल्यात पहायला मिळत आहे. प्रकाश आंबेडकरांना निवडणूकीचा चांगला अनुभव आहे. त्यातुलनेत इतर दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. 

अकोला लोकसभा मतदार संघात 1984 पासून झालेल्या 10 लोकसभा  निवडणूकीत ॲड.आंबेडकर निवडणूक रिंगणात होते. तिरंगी लढतीत त्यांना आठ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. 1998 व 1999 मध्ये काँग्रेसच्या पाठींब्यावर ॲड.आंबेडकर विजयी झाले होते. सरळ लढतीत 1998 साली आंबेडकर केवळ 32,782 एवढ्या कमी मताधिक्याने विजयी झाले होते.

त्यावेळी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अकोल्यात मुक्कामी थांबून सहकार लॉबीला तंबी देत आंबेडकरांना विजयी करण्याचा दम दिल्याने आंबेडकर विजयी होवू शकले. त्यानंतर 1999 च्या  निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात होता. या पक्षातर्फे अकोल्यात डॉ. संतोष कोरपे हे मराठा पाटील समाजाचे उमेदवार होते. त्यांना 1 लाख 23 हजार 640 मते मिळाल्याने बहुतांश भाजपाचीच मते कमी झाली. तरी सुध्दा अॅड. आंबेडकर केवळ 8,716 एवढ्या कमी मताधिक्याने विजयी झाले होते.

1984 पासून झालेल्या निवडणूकीत ज्यावेळी काँग्रेसतर्फे मराठा पाटील उमेदवार रिंगणात होता त्यावेळी ॲड.आंबेडकर विजयाच्या जवळ गेले वा विजयी झाल्याचा इतिहास आहे. 1984 च्या निवडणूकीत काँग्रेसचे मधुसूदन वैराळे यांना 1,78,874 तर प्रकाश आंबेडकरांना 1,65,064 मते मिळालीत. आंबेडकरांचा केवळ 13,810 मतांनी पराभव झाला. 1996 च्या निवडणूकीत काँग्रेसने परत मराठा पाटील समाजाचे डॉ. संतोष कोरपे यांना उमेदवारी दिली होती.

यावेळी ॲड. आंबेडकरांचा केवळ 9,053 मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत सातव्या फेरी अखेर 63 हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते. हीच स्थिती कायम राहिल्यास अकोला मतदारसंघातून आंबेडकर खासदारकीपासून पुन्हा वंचितच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT