Maharashtra Politics Latest News : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्याशी ठाकरे गटातील नेत्याचे संबध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात केला होता. राणे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सलिम कुत्ताच्या पार्टीमध्ये नाचत असल्याचा एक फोटो सभागृहात दाखवत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सलिम कुत्ताच्या पार्टीचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले. याच प्रकरणावरून आता शिंदे गटाच्या नेत्यांनी नागपुरातील विधानभवनाबाहेर ठाकरे गटाविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत.
भाजप आमदार नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे नेते बडगुजर यांचा दाऊदचा हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलिम कुत्ता याच्या सोबत पार्टी करत असल्याचा फोटो दाखवला होता. तसेच सलिम कुत्ता हा पॅरोल रजेवर असताना रजेच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाच्या आरोपीसोबत पार्टी करतो, हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचा आरोप करत यामध्ये आणखी कोणाकोणाचे संबंध आहेत, याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी या आरोपाची दखल घेत एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे जाहीर केले.
दरम्यान, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सोबत ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ समोर आल्याने शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांना आयतेच कोलीत हाती लागले. त्यामुळे सोमवारी शिंदे गटाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर उद्धव ठाकरे गटाचा नवा नेता... सलिम कुत्ता... सलिम कुत्ता अशी घोषणाबाजी करत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सलिम कुत्ताने उबाठा गटात प्रवेश केला असल्याचा टोलाही शिंदे गटाच्या आमदारांनी लगावाला. या निदर्शन आंदोलनात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, आमदार बांगर, संदिपान भुमरे, आमदार कुडाळकर यांच्यासह इतरांनी सलिम कुत्ताच्या निषेधाचे बॅनर झळकवत ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप झाल्यानंतर बडगुजर यांनी मी सलिम कुत्ताला भेटलो असेल. मात्र, मी त्याच्या सोबत पार्टीमध्ये असल्याचा व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर दुसरीकडे सोमवारी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी तर सलिम कुत्ता याची हत्या झाला असल्याचा दावा केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे स्पष्ट केले असून नाशिक पोलिसांकडून ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच नाशिक पोलीस या प्रकरणात पुणे येथील येरवडा कारागृहात जाऊन सलिम कुत्ता याचा जबाब घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बडगुजर हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले होते. या दरम्यानच शिंदे गटाच्या नेत्यांनी सलिम कुत्ता प्रकरणावरून ठाकरे गटावर प्रहार करण्याची संधी साधली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.