Devendra Fadnavis - Lalit Patil  Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचा गौप्यस्फोट! पोलिस आयुक्तांचे पत्र केले उघड

Maharashtra Assembly Winter Session Devendra Fadnavis On Lalit Patil Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात मोठी माहिती दिली आहे...

Sachin Fulpagare

Maharashtra Assembly Winter Session 2023 : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत मोठी माहिती दिली. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत 4 पोलिस बडतर्फ तर 6 निलंबित करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात तस्करीत पोलिसही सामील आहेत का? असा प्रश्न विधानपरिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. या प्रकरणात ड्रग्ज तस्करीत पोलिस सामील नाहीत. पण जिथे त्यांनी कर्तव्य बजावायला हवे होते ते त्यांनी केले नाही. एक प्रकारे त्याला त्यांनी मदतच केली आहे. यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार?

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात 4 पोलिस बडतर्फ केले आहेत. त्यातील दोघांना अटक झाली आहे. याशिवाय 6 पोलिस निलंबित करण्यात आले आहेत. असे एकूण 10 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी देणार आहात का? असा प्रश्न यावेळी सचिन अहिर यांनी सभागृहात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांना अटक करण्याची गरज असेल तर मागेपुढे बघितले जाणार नाही. पण ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. या संदर्भात कुठलेही धागेदोरे सापडले तर राज्य सरकारकडून कारवाई होईल, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.

ड्रग्ज हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ड्रग्ज संदर्भात राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि पोलिस महासंचालकांची बैठक घेतली. सर्व प्रकरणे केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याऐवजी राज्यांच्या ज्या तपास यंत्रणा आहेत, त्यांनी समन्वय साधवा, अशी सूचना केली. यातून एक व्यवस्था उभारण्यात आली आहे. तेव्हापासून विविध राज्यांमध्ये गुप्तचर माहितीची उत्तम देवाणघेवाण होते आहे. त्यामुळेच ड्रग्जविरोधी कारवाईला वेग आला आहे, असे सांगत सीबीआय चौकशीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे नकार दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ललित पाटीलने काही लोकांना केमिस्ट वगैरेंना धरून 2020 मध्ये ड्रग्जचा कारखानाच उघडला. त्यानंतर तो पकडला गेला. आणि त्यानंतर जे काही घडले ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यासंदर्भातही काही खुलासे मी करणार आहे. आता या संदर्भात कुणालाही सरकार पाठीमागे घालणार नाही. मग तो कोणीही असू द्या. कारण हा भावी पिढीचा प्रश्न आहे. सुरुवातीला आपण निलंबनाची कारवाई करतो. पण या प्रकरणात ज्यांचा थेट सहभाग आढळून आला, त्या पोलिसांना 311 अंतर्गत बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली. (Assembly Winter Session)

ललित पाटीलची नार्को टेस्ट करणार आहात का?

सचिन अहिर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. नार्को टेस्टची परवानगी द्या, अशी मागणी कोर्टाकडेही करण्यात येईल. नार्को टेस्टसाठी प्रशासनाला सूचना देण्यात येतील. या प्रकरणाच्या राजकारणात मला जायचे नाही. पण 2 एप्रिल 2021 ला पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गृहमंत्रालयाला एक पत्र पाठवले होते. ललित पाटील हा संबंधित गुन्ह्यात आहे. याची पोलीस कोठडी घेण्याची गरज होती. आणि ती घेतलेली नाही. आता 15 दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. पोलिस कोठडी घ्यायची असेल तर उच्च न्यायालयात अपील करावे लागेल, असे कृष्ण प्रकाश यांनी म्हटले होते. पण ती परवानगी काही दिली गेली नाही. एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी पकडला गेला. त्या आरोपीची एक दिवसही त्यावेळी पोलिसांकडून चौकशी झाली नाही. आता जी चौकशी सुरू आहे, ती दुसऱ्या गुन्ह्यात होतेय. पण जो कारखाना सापडला त्या गुन्ह्यात चौकशीच झालेली नाही. मला अजिबात राजकीय रंग द्यायचा नाही. पण ही परवानगी कुणी आणि का नाही दिली, का ललित पाटीलला कोठडी मिळाली नाही, कुणी परवानगी दिली नाही? असे प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर अंगुली निर्देश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT