Maharashtra Drought  Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Drought : धक्कादायक : दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली! अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे...

Mangesh Mahale

Yavatmal Farmer News: राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांना अतिवृष्टीसाठी सरकारकडून मदत न मिळाल्याने जगावं कसं, असा प्रश्न पडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

नितीन भारत पाने (जामवाडी), प्रवीण काळे (हिवरी), त्र्यंबक केराम (खडकी), मारोती चव्हाण (शिवणी), गजानन शिंगणे (अर्जुना) आणि तेवीचंद राठोड (बाणगाव) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली शेती, त्यात घेतलेले पीक हे निकामी होत असल्याचे पाहून पुढे जगावं कसं या विवंचनेतून या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याची माहिती आहे.

यवतमाळ तालुक्यातील जामवाडी गावातील तरुण अल्पभूधारक शेतकरी नितीन पाने याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीनवर बचत गटासह एका सरकारी बँकेचे कर्ज होते. त्याची तीन एकर शेत हे गावातील नाल्यालगत होते. अतिवृष्टीमुळे त्याचे शेत खरडून गेले. त्यातही त्याने हिंमत न हारता पुन्हा शेती तयार केली.

आपल्या तीन एकर शेतात कर्ज काढून कपाशी व तुरीची लागवड केली. मात्र, शेत खरडून गेल्याने जमिनीचा पोत घसरला होता, त्यात घेतलेले पीक हे निकामी झाले, त्यामुळे तो सतत विवंचनेत होता. बँकेचे कर्ज, आईचे वैद्यकीय उपचार या सगळ्याचा विचार करत त्याने शेवटी मृत्यूला कवटाळले. घरातील कर्ता मुलगा गमावल्याने पाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अन्य कुटुंबीयांची परिस्थितीही काहीशी अशीच आहे.

गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात एक हजार ५८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. गेल्या २५ वर्षांतील ही विक्रमी संख्या असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षीच्या कापूस, सोयाबीनच्या मंदीमुळे तसेच प्रचंड नापिकीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. लागवडीचा खर्च वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे या आत्महत्या होत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची ही मदत न मिळाल्याने जगावं कसं, असा प्रश्न पडला आहे. राज्य सरकार या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT