Anil Deshmukh-shayam Manav-Devendra Fadnavis- Chandrasekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Vs Maha Aghadi : ‘फडणवीसांच्या बदनामीसाठी महाआघाडीने केंद्र उभारले; श्याम मानवांनी त्याचे उद्‌घाटन केले’

Chandrashekhar Bawankule's Allegation : महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ बिघडवून विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीने स्वतंत्र केंद्र निर्माण केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक श्याम मानव यांनी त्या केंद्रातून वादाची सुरुवात करून त्याचे उद्‌घाटन केले आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 25 July : भारतीय जनता पक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला बदनाम करण्यासाठी, तसेच महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ बिघडवून विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीने स्वतंत्र केंद्र निर्माण केले आहे.

या केंद्राच्या माध्यमातून रोज नवीन वाद उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक श्याम मानव यांनी त्या केंद्रातून वादाची सुरुवात करून त्याचे उद्‌घाटन केले आहे. त्यांचा आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा काही संबंध नाही. तो त्यांचा विषयसुद्धा नाही. त्यांच्या चमूमध्ये एकूण 68 लोकांचा समावेश आहे. वेळ आल्यावर आपण त्यांची नावे उघड करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देऊन त्यांना पाकिस्तानचे झेंडे फडकावायचे आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. त्यांना प्रतिज्ञापत्र भरून देण्यास सांगण्यात आले होते, असा आरोप श्याम मानव यांनी केला होता. त्यास दुसऱ्या दिवशी अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला होता. देशमुखांच्या प्रकरणावरून सध्या राज्यात वादंग उठले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला जोरदारपणे सुरू आहेत.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहिल्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढतील, याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे फडणवीस यांनाच पहिले टार्गेट केले जात आहे. समाजा-समाजात विभागणी करून महाराष्ट्राला असुरक्षित करण्याचे काम इंडिया आघाडीचे नेते करीत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

आमदार अनिल देशमुख हे सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) कोठडीत होते. जवळपास दीड वर्षापासून ते जामिनीवर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ते कधी काही बोलले नाहीत. विधानसभेची निवडणूक जवळ येताच ते बोलायला लागले आहेत, याचा अर्थ हा त्यांचा राजकीय अजेंडा असल्याचे स्पष्ट होते.

अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. कोणतीही तक्रार करायची असेल तर 24 तासांत करावी लागते. एवढी माहिती त्यांना नक्कीच असावी. ते इतके हतबल कसे असू शकतात, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT