Ajit Pawar Mahayuti News
Ajit Pawar Mahayuti News  Sarkarnama
विदर्भ

Mahayuti News : अजितदादांचे विदर्भातील कार्यकर्ते अस्वस्थ; विधानपरिषदेसाठी मुंबईत घिरट्या...

Rajesh Charpe

Nagpur News : महायुतीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भात जागा मिळेल की नाही याची शंका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आतापासूनच सतावत आहे. हे बघता आपला दावा भक्कम करण्यासाठी तसेच पक्षबांधणी करिता विधान परिषदेवर विदर्भातील एका प्रतिनिधीला पाठवण्याची मागणी केली जात आहे.

विधान परिषदेत कोणाची लॉटरी लागेल याचा काही नेम नसतो. आपला नंबर लागावा यासाठी अनेक इच्छुक मंत्र्यांच्या मागेमागे फिरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार आणि ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर यांनी मुंबईत घिरट्या घालणाऱ्यांना नको तर पक्षाचे प्रामाणिपणे काम करणाऱ्यांना तसेच विदर्भातील कुणा एकाला विधान परिषदेवर पाठवण्याची मागणी केली आहे.

लोकसभेत महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) फारच कमी जागा दिल्या होत्या. विदर्भात एकही जागा सोडण्यात आली नव्हती. सुनील तटकरे यांचा अपवाद वगळता एकही उमेदवार राष्ट्रवादीचा निवडून आला नाही. हे बघता आगामी विधान सभेच्या निवडणुकीत नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जागा मिळेल की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विदर्भातील कार्यकर्ते फारच अस्वस्थ झाले आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी तसेच पक्षवाढीसाठी विदर्भातून किमान एका कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी पवार व गुजर यांनी केली आहे. हे करताना मुंबईत घिरट्या मारणाऱ्यांपासून सावध राहण्याचाही सल्ला त्यांनी दिला आहे. घिरट्या मारणारे कोण याची नावे दोघांनी सांगितली नाही. मात्र विदर्भात पक्षाचे काम करण्याऐवजी मंत्रालयात आणि नेत्यांच्या मागेमागे फिरणारे कार्यकर्ते आमच्या पक्षात भरपूर असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य ओबीसी समन्वयक ईश्वर बाळबुधे यांनी आधीच अजित पवार यांच्याकडे आपणास विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

शरद पवार (Sharad Pawar) गटाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आमदार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी खाते उघडले आहे. अमर काळे हे वर्धा लोकसभेतून निवडूण आले आहेत. हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करणे आवश्यक आहे. विधान परिषदेत विदर्भातील कार्यकर्त्याला संधी देऊन याची सुरुवात करावी असेही पवार आणि गुजर यांनी सुचवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT