Nagpur News : महायुतीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांचा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत. आताही ते आपला सर्व राग फडणवीस यांच्यावरच काढत आहेत, याकडे लक्ष वेधून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना टार्गेट केले जात असल्याचे सांगितले.
मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. यादरम्यान ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत आहेत. शिंदे यांना आरक्षण देण्याचे काम करू दिले नसल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे. यावरून ते मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक द्वेष करीत असल्याचे दिसून येते. कोणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर ते काम करीत असावे, अशी शंका बावनकुळे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र जरांगे यांना ते मान्य नाही. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा व त्यातून आरक्षण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. संविधानानुसार असे आरक्षण देता येत नाही. ओबीसी समाजाचे 27 टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीत भाजप महायुतीला जनतेनी 51 टक्के मते दिली आहेत. यावरून देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता सिद्ध झाली आहे. मात्र त्यांच्याबाबत जरांगे पाटील जे बोलत आहे, त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करीत आहे ते योग्य नाही. त्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असेही बानवकुळे यांनी स्पष्ट केले.
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही. ओबीसी संघटनांनीही हे यापूर्वीच जाहीर केले आहे. ओबीसी समाजात अठरापगड जाती आहेत. 27 टक्के आरक्षण जातींच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम ठेवले आहे. मराठा समाजालासुद्धा आरक्षण मिळाला पाहिजे. ही सरकारचीसुद्धा भूमिका आहे. त्या दिशेने सरकार पुढे जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.