Dharmaraj Baba Atram News Sarkarnama
विदर्भ

Dharmaraj Baba Atram News : 'आदिवासी समाजाला आरक्षणाबाबत 'नो टेन्शन'; फक्त बोगस प्रमाणपत्रवाले शोधा !'

Tribal Community Reservation News : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या जातीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे.

अतुल मेहेरे

Nagpur News : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या जातीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गातून आरक्षण हवेच आहे. मात्र, ओबीसींना आपल्या आरक्षणात वाटेकरी नकोय, धनगर समाजही आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मागत आहे, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही डोकं वर काढतोय. अशात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmaraj Baba Atram) यांनी आदिवासी समाजाला आरक्षणाबाबत 'नो टेन्शन' असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात आदिवासी समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. आदिवासी समाजाला मिळालेल्या आरक्षणात इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करता येत नाही. तशी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे आदिवासींचे आरक्षण हिरावले जाईल, ही भीती व्यर्थ असल्याचे सूतोवाच आत्राम यांनी केले. आदिवासी प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाविषयी सर्वच बाबी संविधान व कायद्यात स्पष्टपणे नमूद आहेत. त्यामुळे ऊठसूठ कोणत्याही प्रवर्गाला आदिवासी समाजात समाविष्ट करता येत नाही. परिणामी जे लोक आदिवासी समाजाचे आरक्षण हिरावले जाईल, अस अपप्रचार करीत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे आत्राम म्हणाले.

आदिवासी असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे. सुमारे एक लाख लोकांनी आदिवासी असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवित नोकऱ्यांवर कब्जा केला आहे. या बोगस प्रमाणपत्रधारकांना शोधण्याची गरज आहे. अशी प्रमाणपत्रे रद्द करून जे खरे आदिवासी आहेत, त्यांना नोकऱ्यांमध्ये संरक्षण देणे गरजेचे आहे. बोगस प्रमाणपत्र मिळविणारे लोक आदिवासींचा खरा हक्क मारत आहेत. खरा धोका अशा बोगस प्रमाणपत्रधारकांकडून आहे. त्यामुळे या बोगसबाजीला चाप लावण्याचे काम झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी आत्राम यांनी केली.

केवळ आदिवासी समाजच नव्हे अनेक प्रवार्गाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून लोकांनी नोकऱ्या बळकावल्या आहेत. अशांवर कारवाई होणे गरजेची आहे. राज्यात असे प्रकार सुरू राहिल्यास त्या-त्या प्रवर्गातील खरे गरजू सरकारी योजना व नोकऱ्यांपासून वंचित राहतील, असे ठाम मत आत्राम यांनी व्यक्त केले. कोणत्याही समाजात फूट पाडत एखाद्या विशिष्ट समाजाला खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही.

आरक्षणाबाबत तो तिढा सध्या राज्यात निर्माण झाला आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांसह शासनातील सर्व मंत्री व नेते यशस्विपणे तोडगा काढतील, असा विश्वास आत्राम यांनी व्यक्त केला. समाजात फूट पाडण्यासाठी जे लोक भावना भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशांपासून प्रत्येक समाजाने सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही अफवांवर कोणत्याही समाजाने विश्वास ठेऊ नये, असे आत्राम यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT