MLA Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Amravati Bacchu Kadu : विदर्भासाठी अधिवेशनात पाच दिवस पाहिजेच!

Nagpur Assembly : आमदार बच्चू कडू यांची सरकारकडे आग्रही मागणी

Amar Ghatare

Winter Session 2023 : उपराजधानी नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी किमान पाच दिवस राखीव ठेवावेत, अशी आग्रही मागणी प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी आमदार कडू बोलत होते. गुरुवारपासून (ता. 7) नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. (MLA Bacchu Kadu From Amravati District Demands Government To Keep Reserved Five Days In Nagpur Winter Assembly Session 2023 For Issues From Vidarbha)

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होते, परंतु अधिवेशनाच्या निमित्तानं विदर्भातील सर्वच प्रश्न निकाली निघतात असं नाही. यंदा गुरुवारपासून सुरू होणारं अधिवेशन केवळ 10 दिवस चालणार आहे.

त्यातही काही दिवस शोकप्रस्ताव, पुरवणी मागण्या, गोंधळ यामुळं कमी होणार आहे. त्यामुळं विचार केल्यास अधिवेशन फक्त पाच ते सहा दिवस चालेल. अशात विदर्भाच्या मुद्द्यांना केव्हा हात घालायचा असा प्रश्न पडणार असल्याचं आमदार कडू म्हणाले.

नागपुरात अधिवेशन घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. सुमारे एक महिना आधीपासून अधिवेशनाची तयारी नागपुरात सुरू असते. मंत्री, अधिकाऱ्यांचे बंगले चकाचक होतात. अख्खं मंत्रालय, सचिवालय नागपुरात मुक्कामी असते.

दरवर्षी होणारं हे अधिवेशन म्हणजे नेते आणि अधिकाऱ्यांची सहल नाही. विदर्भातील समस्या सुटाव्यात, यासाठी हे अधिवेशन नागपुरात घेण्याची तरतूद आहे. परंतु अलीकडच्या काळात ते प्रश्न सुटताहेत का, यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे, असं कडू यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदाच्या अधिवेशनाचा कालावधी मुळातच कमी दिवसांचा आहे. अशात विदर्भाने अनेक महत्त्वाचे मुद्दे मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भातील या अधिवेशनाला व येथील जनतेला न्याय द्यायचा असेल, तर सरकारनं एक तर अधिवेशनाचा कालावधी वाढवायला हवा किंवा 10 दिवसांपैकी किमान पाच दिवस तरी फक्त विदर्भातील महत्त्वाच्या विषयांसाठी राखीव ठेवायला हवेत, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

आपण यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणार आहोत. विदर्भाच्या प्रश्नांसाठी खास पाच दिवस देण्यात यावेत, अशी मागणी करणार आहोत. विदर्भातील उर्वरित आमदारांनीही त्यासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे.

15 दिवसांच्या अधिवेशनात चार दिवसांच्या सुट्ट्या येत आहेत. ही बाब सर्वच लोकप्रतिनिधींनी लक्षात घेतली पाहिजे. जोपर्यंत विदर्भातील लोकप्रतिनिधी यासाठी एकत्रित येत मागणी करणार नाही, तोपर्यंत विदर्भातील महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण होऊ शकणार नाही, असं मतही आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT