MNS vs Jain Community Sarkarnama
विदर्भ

MNS vs Jain Community : ‘मर्यादा ओलांडू नका’; जैन समाजाच्या युवा नेत्याचा मनसेचे संदीप देशपांडेंना थेट फोन करत इशारा

Mumbai white road stripe controversy escalates MNS leader Sandeep Deshpande remarks against Jain community trigger sharp backlash and social tension : नंदुरबार जिल्ह्यातील कुणाल जैन आणि संदीप देशपांडे यांच्यात झालेल्या फोन संभाषणात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.

Pradeep Pendhare

Mumbai White Stripes Controversy : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर मारण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता मोठे राजकीय आणि सामाजिक स्वरूप धारण केले आहे.

सुरवातीला स्थानिक पातळीवर सुरू झालेला हा वाद आता भाषिक आणि धार्मिक रंग घेताना दिसत असून, त्यामुळे राज्यातील वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी जैन समाजावर ‘सांस्कृतिक दहशतवाद’ असा गंभीर आरोप करत केलेल्या वक्तव्यामुळे जैन समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याविरोधात जैन समाजाचे युवा नेते कुणाल जैन यांनी थेट संदीप देशपांडे यांना फोन करून त्यांच्या वक्तव्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील कुणाल जैन आणि संदीप देशपांडे यांच्यात झालेल्या फोन संभाषणात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी कुणाल जैन यांनी देशपांडे यांना स्पष्ट शब्दांत सुनावत सांगितले की, मराठी आणि जैन समाज महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र काही राजकारणी केवळ स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, आपल्या आधीच्या भूमिकेचे समर्थन करत संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, सार्वजनिक रस्त्यांवर परवानगी न घेता पांढऱ्या पट्ट्या आखणे, नियम डावलून स्वतःची मर्जी चालवणे हा ‘सांस्कृतिक दहशतवाद’चाच प्रकार आहे. तसेच, “आमच्या धर्माच्या आड येऊ नका,” असा इशाराही त्यांनी दिला.

या वादानंतर कुणाल जैन यांनी अधिकृत प्रतिक्रिया देताना मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. “जैन समाज हा अहिंसा, शांतता आणि सहअस्तित्वावर विश्वास ठेवणारा समाज आहे. एखादा स्थानिक मुद्दा असू शकतो, त्यावर चर्चा होऊ शकते. पण संपूर्ण जैन समाजाला लक्ष्य करून धार्मिक रंग देणे अत्यंत चुकीचे आहे,” असे ते म्हणाले.

कुणाल जैन यांनी पुढे आरोप केला की, संदीप देशपांडे वारंवार जैन धर्म, आमचे सण-उत्सव आणि साधू-संत यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत आहेत. “हे आता सहन केले जाणार नाही. समाजातील मोठे नेते गप्प असतील, पण युवक आता शांत बसणार नाहीत,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.

तसेच त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुमचा वाद स्थानिक प्रश्नांपुरता असेल तर तो तिथेच मर्यादित ठेवा. दोन समाजांमध्ये द्वेष आणि संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न त्वरित बंद करा. अन्यथा जशास तसे उत्तर देण्याची क्षमता जैन समाजातील युवकांमध्येही आहे.”

दरम्यान, मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांपासून सुरू झालेला हा वाद आता केवळ प्रशासन किंवा स्थानिक प्रश्न राहिलेला नसून तो सामाजिक आणि धार्मिक संघर्षाच्या दिशेने जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT