Nagpur News : राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख पराभूत झालेत. यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि नागपूर शहरप्रमुख प्रशांत पवार आणि जिल्हाप्रमुख बाबा गुजर यांनी देशमुखांच्या घरासमोरच भले मोठे होर्डिंग लावून त्यांना डिवचले आहे.
महाराष्ट्राने ठरवले राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे वारसदार अजितदादाच आणि 'तुतारी'चे निवडून आलेले दहा आमदारांचे दादा हेच वाली, असा ठळक उल्लेख त्यावर करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये देशमुखांच्या घरासमोर लावण्यात आलेल्या होर्डिंगची मोठी चर्चा आहे. अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दादासोबत येण्यास नकार दिला होता. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडले होते. पवार आणि बाबा गुजर यांना अनुक्रमे शहर व जिल्हाध्यक्ष करण्यात आले होते.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेत महाविकास आघाडीने मुसंडी मारली होती. वर्धा लोकसभा मतदारसंघातून तुतारीचे अमर काळे निवडून आले होते. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढला होता. यातच नागपूर जिल्ह्यात अजित पवार गटाला एकही जागा सोडण्यात आली नव्हती, तर दुसरीकडे शरद पवार यांनी कधी नव्हे, तरी नागपूर शहरातील पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून आणला. नागपूर ग्रामीणमध्ये काटोल आणि हिंगणा हे दोन विधानसभा मतदारसंघसुद्धा आपल्याकडे कायम ठेवले होते. यामुळे अजित पवार यांच्या कार्यकर्त चांगलेच अस्वस्थ झाले होते. अनेकांना अजित दादांसोबत गेल्याचा पश्चातापसुद्धा होत होता.
विधानसभेच्या निकालाने सर्व चित्रच बदलले. तुतारीच्या तीनही उमेदवारांचा दारुण पराभव झाला. दुनेश्वर पेठ यांच्या विरोधात असलेले भाजपचे कृष्णा खोपडे यांनी एक लाखाच्यावर मताधिक्य घेऊन विक्रमांची नोंद केली. एवढेच नव्हे तर तुतारीचे फक्त 10 आमदार निवडून आले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भाची जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर सोपवली होती.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्ते परत येतील, असे ते वारंवार सांगत होते. मात्र आता सर्वच पराभूत झाल्याने अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चिडवणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांनाच उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्याऐवजी सलील देशमुख निवडून लढले. प्रचारादरम्यान अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाली होती. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. यानंतरही सलील देशमुख यांना सहानुभूती मिळाली नाही. उलट देशमुख यांनी बनावट हल्ला घडवून आणला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.