Nagpur Congress  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress : काँग्रेसचे ‘खाते‘ अद्यापही रिकामेच

Rajesh Charpe

Nagpur News : शहर काँग्रेसच्या वतीने विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण नऊ इच्छुकांनी अर्ज घेतले असून सर्वाधिक इच्छुकांची संख्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहे. 20 हजार रुपये भरून अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.

मध्य नागपूरमध्ये पंधरा वर्षांपासून भाजपचे विकास कुंभारे आमदार आहेत. मागील निवडणुकीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके (Banty Shelake) यांनी त्यांनी अटीतटीची लढत दिली होती. थोडक्यात ते पराभूत झाले होते. त्यामुळे मध्य नागपूरमध्ये काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचे इच्छुकांची संख्याही वाढली आहे.

मुस्लिम आणि हलबा समाज बहूल हा मतदारसंघ आहे. माजी मंत्री अनिस अहमद येथून निवडून येत होते. त्यांनी शेजारच्या पश्चिम नागपूर मतदारसंघात शिरकाव केल्यानंतर काँग्रेसला हा मतदारसंघ गमवावा लागला. येथून लढण्यास इच्छुकांमध्ये शहर काँग्रेसचे (Congress) उपाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक रमन पैगवार, माजी नगरसेवक हाजी मोहम्मद कलाम, समाजसेवक मोहम्मद वसीम, माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांचा समावेश आहे. या चौघांनी उमेदवारी अर्ज काँग्रेस भवनातून घेतले आहेत. शहर काँग्रेसच्या अध्यक्ष नंदा पराते आणि माजी अध्यक्ष नॅश अली यासुद्धा येथून लढण्यास इच्छुक असल्या तरी त्यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. बंटी शेळके युवक काँग्रेसच्या कोट्यातून संधी मिळेल या आशेवर आहेत.

एकेकाळी काँग्रेसचा आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी (Satish Chaturvedi) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व नागपूरमधून कोणी लाढण्यास फारसे उत्सुक दिसत नाही. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे येथून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना सर्वाधिक 80 हजार मतांचे मताधिक्य याच मतदारसंघाने दिले आहे. माजी नगरसेवक संजय महाकाळकर यांनी अर्ज घेऊन येथून लढण्यास उत्सुकता दर्शवली आहे. सोबतच त्यांनी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरही दावा केला आहे. पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष विकास ठाकरे आमदार असताना विनिती चौरसिया या कार्यकर्त्याने अर्ज घेतला आहे.

इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करताना 20 हजार रुपये आणि अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना 10 हजार रुपये भरायचे आहेत. अद्याप एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. यावेळी तरी शहर काँग्रेस कार्यालयात अर्ज सादर करणार्‍यांचा विचार उमेदवारी वाटप करताना करावा अशी मागणी केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT