Nagpur Graduates Constituency Election Sarkarnama
विदर्भ

Nagpur Graduates Constituency Election : नागपूर पदवीधर निवडणुकीपूर्वी मोठा पेच; 98,782 मतदारांचा मुद्दा हायकोर्टात

Nagpur Graduates Election faces a voter-list challenge as a petition claims 98,782 eligible voters were left out of the final electoral roll : अंतिम मतदारयादीत पात्र मतदारांची नावे नसल्याचा दावा; 8 ऑक्टोबरच्या सुनावणीकडे लक्ष

Pradeep Pendhare

Nagpur voter list controversy : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आता न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अंतिम मतदारयादीत 98 हजार 782 पात्र मतदारांची नावे समाविष्ट नसल्याचा दावा करत आरटीआय फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन कलबांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवार, 8 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

याचिकेमुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी मतदारयादीच्या (Voter List) प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रलंबित मतदार नोंदणी अर्जांची छाननी न करता पात्र मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

नागपूर (Nagpur) विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचे अनेक अर्ज अद्याप प्रलंबित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या अर्जांची नियमानुसार छाननी करून पात्र ठरणाऱ्या मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रलंबित अर्जांची तपासणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे नेऊ नये, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना त्यांच्या नावाबाबत, मतदारयादीतील तपशीलाबाबत किंवा पात्रतेबाबत हरकत नोंदवण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार प्रक्रिया पुढे गेल्यास मतदारांना अशा हरकती नोंदवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आधी मतदारयादीची प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्यानंतरच निवडणूक घ्यावी, अशी भूमिका याचिकाकर्त्याने मांडली आहे.

अंतिम मतदारयादी कधी प्रसिद्ध झाली?

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची अंतिम मतदारयादी 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या मतदारयादीसाठी पात्रता दिनांक 1 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आला होता. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. आता ही प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जांचे काय होणार आणि पात्र मतदारांना मतदानाची संधी मिळणार का, हे प्रश्न या याचिकेमुळे उपस्थित झाले आहेत.

उद्याच्या सुनावणीकडे लक्ष

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच मतदारयादीचा मुद्दा उच्च न्यायालयात पोहोचल्याने या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे. गुरुवार, 8 ऑक्टोबरला नागपूर खंडपीठात होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचेही लक्ष लागले आहे. मतदारयादीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत न्यायालयाकडून काही निर्देश दिले जातात का आणि त्याचा निवडणूक कार्यक्रमावर परिणाम होतो का, हे सुनावणीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT