

Eknath Shinde Shiv Sena BJP dispute : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सुरू झालेला एकनाथ शिंदे शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्ष आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.
सभागृहातील आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावरील धमक्यांनंतर दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत गुन्हे नोंदवले आहेत.
भाजपच्या (BJP) नगरसेविका आणि पाणीपुरवठा सभापती दीपा पंजाबी यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम तसेच त्यांच्या 30 ते 40 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमवणे, अश्लील घोषणाबाजी आणि शिवीगाळ केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. या प्रकारात दीपा पंजाबी यांचा मुलगा अविनाश याच्याविरोधातही अश्लील घोषणाबाजी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, कमलेश निकम यांनीही पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भाजप पदाधिकारी मनीष हिंगोरानी, कपिल अडसूळ, अविनाश पंजाबी, गौरव भालेराव, राकेश पाठक आणि प्रदीप रामचंदानी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधितांनी जीवे मारण्याची धमकी दिली तसेच अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप निकम यांनी तक्रारीत केला आहे.
उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आधीपासूनच राजकीय संघर्ष सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कमलेश निकम यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र झाले.
या राजकीय संघर्षाला सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष राड्याची किनार मिळाल्यानंतर अखेर दोन्ही गटांनी पोलिसांत धाव घेतली. त्यामुळे महापालिकेतील राजकीय कुरघोडीचे रूपांतर आता परस्परविरोधी गुन्हे आणि कायदेशीर लढाईत झाले आहे.
एकाच राजकीय संघर्षातून दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्याने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल केले असून, घटनेमागील नेमका क्रम, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि तक्रारीतील आरोपांची सत्यता याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे आगामी काळात उल्हासनगर महापालिकेतील एकनाथ शिंदे शिवसेना-भाजपमधील सत्तासमीकरण आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.