Sunil Kedar During Treatment In Hospital Sarkarnama
विदर्भ

Nagpur News : ललित पाटील प्रकरणानंतर सुनील केदारांबाबत आरोग्य विभागाचे सावध पाऊल

NDCCB Bank Scam : दोन लिटर ऑक्सिजनचा पुरवठा; कोविड चाचणीही शक्य

प्रसन्न जकाते

Sunil Kedar News : ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला शासकीय रुग्णालयात मिळालेल्या ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’मुळे विरोधकांनी आरोग्य यंत्रणा व सरकारला चांगलेच इजेक्शन टोचले होते. अशात अधिकाऱ्यांना आता यंत्रणेत असे ‘व्हायरस’ शिरू नये, यासाठी ‘प्रिवेंटिव्ह’ उपचार सुरू केले आहेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळाप्रकरणी कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलेले मुख्य आरोपी तथा माजी आमदार सुनील केदार यांच्याबाबत तर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्तुळात प्रचंड काळजी घेतली जात आहे.

राज्यातील अनेकांना ‘कार्डियाक अरेस्ट’ देण्यापर्यंत पोहोचलेल्या ललित पाटील प्रकरणात पुणे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता निलंबित झालेले आहेत. अशात शिक्षण व संशोधन विभागाने शासकीय वैद्यकीय क्षेत्रासाठी सक्त मार्गदर्शन दिशानिर्देश काढले आहेत. शिक्षा सुनावलेल्या कैदी रुग्णाचा रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत दर तीन दिवसांनी डॉक्टरांच्या पथकाने आढावा घ्यावा, असे यात स्पष्टपणे नमूद आहे.

कैदी रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी वाढवायचा असल्यास अधिष्ठात्यांना अगोदर कळवावे लागणार आहे. कैदी रुग्णास विनाकारण दीर्घ काळ रुग्णालयात दाखल केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित डॉक्टरांच्या पथक प्रमुखाला गंभीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असे यात म्हटले आहे. त्यामुळे सुनील केदार यांच्याबाबत नागपूर वैद्यकीय रुग्णालय प्रशासन खूपच बारकाईने पावले टाकत आहे.

डोकेदुखी आणि इतर काही तक्रारी केल्यामुळे सुनील केदार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) मेडिसीनच्या वॉर्ड क्रमांक 52 मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या ते अतिदक्षता विभागात आहेत.

केदार यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. ईसीजी काढण्यात आला. इको चाचणीही करण्यात आली. रक्ताच्याही अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांना अर्धशिशीचा (Migraine) बराच जुना त्रास आहे. अशात त्यांना दोन लिटर ऑक्सिजनचा बाह्यपुरवठा केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डोकेदुखीसह छातीत वेदना होत असल्याची तक्रारही केदार करीत आहेत. केदारांच्या ईसीजीमध्ये काही बदल डॉक्टरांना आढळले आहेत. हे बदल आधीचे आहेत की आताचे हे तपासले जात आहे. त्यानुसार गरज भासल्यास डॉक्टर ‘अँजियोग्राफी’ (Angiography) करायची की नाही, याचा निर्णय घेणार आहेत. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून केदार यांना सर्दी, खोकला व घशात खवखव कायम आहे. त्यामुळे त्यांची कोविड चाचणीही केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

केदार हे राज्याचे माजी मंत्री आहेत. काँग्रेसचे ते नागपुरातील दिग्गज नेते आहेत. शिक्षा झाल्यानंतर रविवारी (ता. 24) नागपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाचा निकाल पोलिसांनी राज्य विधिमंडळाकडे सोपविला. त्यानुसार रविवारी केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली.

कोर्टाने केदार यांच्यासह बँक घोटाळा प्रकरणातील अन्य आरोपींना शिक्षा सुनावली तो दिवस शुक्रवार (ता. 22) होता. सोमवारपर्यंत (ता. 25) शासकीय सुटीमुळे कामकाज बंद आहे. त्यामुळे केदार यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध मंगळवारी दाद मागता येणार आहे. अशात केदार यांच्यासारखे ‘हायप्राफाइल’ व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्याने आरोग्य व पोलिस दोन्ही यंत्रणांवरील ताण काहीसा वाढला आहे.

उपचार घेतानाचा फोटो व्हायरल

रुग्णालयातील ज्या अतिदक्षता विभागात केदार दाखल आहेत, तेथे तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त या कक्षात अन्य कोणालाही प्रवेश नाही.

अशात केदार यांचा उपचार घेतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो आत्ताचा असल्यास तो कसा लिक झाला, हे अस्पष्ट आहे. तो केव्हाचा आहे, याबद्दलही अनिश्चितता आहे. अशात डॉक्टरांच्या अहवालावर केदार यांच्या रुग्णालयातील वास्तव्याचा निर्णय होणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT