Nagpur Nagarparishad Election 2025: नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म जोडून प्रेम झाडे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यांची अवस्था दोन्ही कडचा पाहुणा उपाशी अशी झाली. भाजपच्या नरेश चरडे यांनी त्यांचा मोठा फरकाने पराभव केला. विशेष म्हणजे झाडे हे यापूर्वी याच नगर परिषदेत भाजपचे नगराध्यक्ष होते.
वाडी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरून काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या झाडे यांना एबी फॉर्म दिला होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस हेसुद्धा याच नगर परिषदेत वास्तव्यास आहेत. काँग्रेसकडे अनेक सक्षम उमेदवार असताना झाडे यांना उमेदवारी देण्याचे कारण काय असा सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता.
मात्र, केदारांनी कोणाचेच ऐकले नाही. झाडे हे वाडी नगर परिषदेचे अध्यक्ष असताना भाजपचे आमदार समीर मेघे यांच्यासोबत त्यांचे खटके उडाले होते. त्यानंतर झाडे यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड टाकली होती. त्यांच्या घरून पाच लाख रुपयांचे रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर झाडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभेच्या निवडणुकीत मेघे आणि केदार यांच्यात चांगलेच खटके उडाले होते. केदारांनी मेघे यांना उघड आव्हान दिले होते.
दुश्मन का दुश्मन दोस्त या न्यायाने केदारांनी झाडे यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार केले. मात्र त्याने काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी दाखल केली होती.निष्ठवंतांना डावलल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुमारे दोनशे कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीने पत्र पाठवले होते.
मात्र याची कोणीच दखल घेतली नाही. झाडे यांना पराभूत करून काँग्रेसच्या मतदारांनी कोणालाही लादल्यास खपवून घेणार नाही असा इशाराच निवडणुकीच्या निकालातून दिला आहे. भाजपचे नरेश चरडे हे काँग्रेस प्रेमनाथ झाडे यांच्यापेक्षा सुमारे चार हजार मतांनी समोर आहेत. काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना आपले गाव राखता आले नाही. केदारांच्या समर्थकांचा सावनेरमध्ये पराभव झाला. आता त्यांचेच समर्थक असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनाही वाडी नगर परिषदेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.