Dharmarao Baba Atram Sarkarnama
विदर्भ

Dharmarao Baba Atram: मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा धमकी; सूरजागड प्रकल्प थांबवा, अन्यथा...

प्रसन्न जकाते

Gadchiroli Aheri : सूरजागड येथील लोहखाणींना माओवाद्यांचा विरोध आहे. या खाणींसाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांचे जावई हेच जबाबदार आहेत, असा आरोप करीत माओवाद्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा एकदा धमकी दिली आहे.

माओवाद्यांकडून आतापर्यंत त्यांना सहाव्यांदा धमकी देण्यात आली आहे. एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह खनिज प्रकल्पाला सुरुवातीपासूनच माओवाद्यांचा विरोध आहे. त्यासाठी सहा महिन्यांपासून आत्राम यांना धमकी देण्यात येत आहे.

सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह खनिज प्रकल्पासोबतच येथे नव्याने सुरू होणाऱ्या पाच लोह खनिज प्रकल्पांना विरोध होत आहे. याच विरोधामुळे नोव्हेंबर 2023 मध्ये एटापल्ली तालुक्यातील तोडघट्टाजवळ आंदोलन करणाऱ्या आदिवासी नेत्यांनी पोलिसांना घेरले होते. त्यानंतर 15 दिवसांसाठी संपूर्ण तालुक्यात कलम 114 लागू करण्यात आला होता. अनेक महिन्यांपासून या भागात खाण प्रकल्पांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी स्टील उद्योग आणि खाण प्रकल्पांच्या कामाची माहिती घेतली. धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आहेत.

त्यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर एटापल्ली तालुक्यातील सूरजागड आणि इतर पाचही खाणींच्या कामाला वेग येईल हे निश्चित मानले जात आहे. अशातच माओवाद्यांनी पुन्हा अहेरी विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे धर्मराव बाबा आत्राम यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पाच महिन्यांत सहावेळा धमकी मिळणारे आत्राम हे गडचिरोली जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना पुरविण्यात येणाऱ्या पोलिस सुरक्षेचा आढावा गृह विभागाने नुकताच घेतला. आत्राम यांची सुरक्षा वाढवावी काय, यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय गृह विभागाकडून झालेला नाही. त्यातच सातत्याने धमक्या मिळत असल्याने आत्राम यांचे समर्थक चिंतेत आहेत. धर्मराव बाबा आत्राम यांच्या गडचिरोलीतील घराबाहेर सध्या सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गडचिरोली पोलिस खबऱ्यांची मदत घेत आहेत. माओवाद्यांनी एखाद्या मंत्र्यावर हल्ला केल्याची घटना गडचिरोलीच्या अलीकडच्या काळातील इतिहासात घडलेली नाही. मात्र, धर्मरावबाबा आत्राम यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे सरकारग आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत.

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर पोलिस आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी आत्राम यांच्या सुरक्षेचा आढावा घेत आवश्यक ती माहिती गृह विभागाला पाठवली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनाही धमकीचे पत्र मिळाले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्यात आला होता. मात्र, वडेट्टीवार यांना मिळालेली धमकी ही मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित होती.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT