Pratibha Dhanorkar Vijay Wadettiwar  Sarkarnama
विदर्भ

Nagpur News: पहाटे समृद्धी महामार्गावर घडला थरार! काँग्रेस नगरसेवकांची अडवली बस अन्...; धानोरकर, वडेट्टीवार गटांचा राडा पोहोचला थेट पोलिसांत

Nagpur News: नागपूर महापालिकेत सत्ता स्थापनेवरुन काँग्रेसच्या दोन गटांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु असून ती आता चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे.

Amit Ujagare

Nagpur News: आमच्यातील मतभेद संपले, महापौर काँग्रेसचा होणार असा दावा काँग्रेसच्या नेत्यांमार्फत केला जात असला तरी काँग्रेसच्या पाच नगरसेवकांना पळवून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासदार प्रतिभा धानोकर यांच्या पाच नगरसेवकांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्‍टीवार यांच्या समर्थकांनी पळवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आता थेट पोलिस ठाण्यात पोहोचले असून काँग्रेसचा सत्तास्थापनेच्या प्रयत्नाला यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वडेट्टीवार समर्थकांनी पळवून नेल्याचा आरोप असलेले दोन नगरसेवक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे परत आले आहेत. उर्वरित तीन नगरसेवकांच्या शोधात निघालेल्या धानोरकर समर्थकांनी पुण्यावरून येणाऱ्या नगरसेवकांची बस हिंगणघाट येथे अडविली. हे प्रकरण अखेर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौर पदाची निवडणूक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली असताना काँग्रेसमधील दोन नेत्यांचे वाद आणखीच वाढले आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला आणखी सहा नगरसेवकांची गरज आहे. अधिकचे संख्याबळ गोळा करण्याची जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वीकारली आहे. तत्पूर्वी वडेट्‍टीवार आणि धानोरकर यांच्यात नगरसेवकांच्या पळवापळवीवरून आधीच वाद रंगला होता.

निवडणुकीनंतर खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार यांनी नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविले होते. दरम्यान, या दोन नेत्यांमधील वादात प्रदेशाध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि गटनेत्याच्या नावाला संमती दिली. त्याच दिवशी गटस्थापनेसाठी धानोरकर समर्थक नगरसेवक नागपुरात पोहोचले. मात्र, गटनेत्याच्या नावाला आमदार वडेट्टीवार यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे धानोरकर यांनी १३ नगरसेवकांचा काँग्रेसचा अधिकृत गट स्थापन केला. यावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. त्यानंतर प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांची आभासी बैठक झाली. या बैठकीत महापौरपद धानोरकर गटाकडे, स्थायी समिती वडेट्टीवार गटाकडे आणि मित्रपक्षाकडे उपमहापौर पद देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा वडेट्‍टीवार यांनी केला होता. त्यानंतर सर्व काही सुरळीत झाले, असे मानून धानोरकर यांनी आपले नगरसेवक घरी पाठविले.

मात्र, दुसऱ्याच दिवशी वडेट्टीवार समर्थकांनी पाच नगरसेवकांना पळवून नेल्याचा आरोप झाला. त्यातील दोन नगरसेवक धानोरकर गटाकडे परतले. उर्वरित तीन नगरसेवक पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघाल्याची माहिती धानोरकर समर्थकांना मिळाली. पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर या नगरसेवकांची बस अडविण्यात आली. या सर्वांनी चेहऱ्यावर दुप्पटा बांधलेला होता. या बसमध्ये राजेश अडूर, सचिन कत्याल, वसंत देशमुख यांच्यासह धानोरकर समर्थक तीन नगरसेवक आणि वडेट्टीवार समर्थक नगरसेवक होते. सौरभ ठोंबरे यांनी बसमध्ये प्रवेश करून ‘सोहेल शेख यांच्याशी बोलून घ्या,’ असे तीन नगरसेवकांना सांगितले. मात्र, बसमधील उर्वरित नगरसेवकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. बस अडविणारे माघारी फिरले. दरम्यान, यातील कानेन सिद्दीक यांना वडेट्टीवार समर्थकांनी ताब्यात घेतले आणि सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात नेले. ‘आम्हाला अडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली,’ अशी तक्रार राजेश अडूर यांनी पोलिसांत दाखल केली आहे. या तक्रारीत कानेन सिद्दीक, मुजम्मीन खान, सौरभ ठोंबरे, जसीम खान, आलोक रोहिदास आणि अदनान शेख यांच्या नावांचा उल्लेख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT