Nagpur News, 05 Nov : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम आणि हलबा समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांची मते निर्णायक आहेत. असे असतानाही काँग्रेस आणि भाजपने हलबा आणि मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नाही.
त्यामुळे दोन्ही समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या दोन्ही समाजाच्या रोषाला कोण बळी पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हलबा समाजाने आपला प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांना उभे केले असल्याने भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे टेंशन वाढले आहे.
हलबा समाजाचे प्रतिनिधी रमेश पुणेकर यांना बॅट हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी हलबा समाज एकजूट झाला आहे. या समाजाने काँग्रेस (Congress) आणि भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार विकास कुंभारे यांनी सलग तीन वेळा येथून विधानसभेची निवडणूक जिंकली आहे.
तर भाजपला (BJP) मध्य नागपूरमध्ये खातेसुद्धा त्यांनीच उघडून दिले होते. यावेळी भाजपचे प्रवीण दटके या युवा नेत्याला उमेदवारी दिली आहे. दटके यापूर्वी भाजपचे शहर अध्यक्ष, महापौर होते. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. मध्य नागपूर मतदारासंघात त्यांचा दांडगा संपर्क आहे. हलबा समाजाच्या कार्यकर्त्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध आहेत.
त्यांनी शासनाच्या पातळीवर हलबा समाजाचे अनेक निर्णयात त्यांचा सहभाग होता. असे असले तरी उमेदवारी नाकारल्याने हलबा समाज भाजपवर नाराज आहे. काँग्रेसकडूनही अनेक हलबा समाजाच्या इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. त्यांनाही डावलण्यात आले आहे. दुसरीकडे मुस्लिम समाजाला काँग्रेसकडून मोठी अपेक्षा होती.
ती फोल ठरली आहे. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल अहमद यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांची समजूत काढण्यात आली आहे. असे असले तरी समाजाची नाराजी कशी दूर करायची असा प्रश्न काँग्रेससमोर आहे. हलबा समाजाने एकजूट होऊन आपला प्रतिनिधी निवडणुकीत उभा केला आहे.
मात्र, मुस्लिम समाजाकडे पर्याय उपलब्ध नाही. हलबा समाजाने काँग्रेस आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी सोबत येण्याचे आवाहन केले आहे. 25 वर्षांपूर्वी जनता दलाचे उमेदवार आणि हलबा समाजाचे नेते यशवंत बाजीराव अवघ्या सहा मतांनी येथून निवडून आले होते. त्यांनी अनिस अहमद यांचा पराभव केला होता. या इतिहासाची पुनरावृत्ती यावेळी होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.