Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सरकारमध्ये घेण्याबाबत महायुतीच्या सरकारमध्ये आता मतमतांतरं निर्माण झाली आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्यावतीने असे पत्र द्यायला नको होते, अशा प्रतिक्रिया आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून व्यक्त होत आहेत.
नवाब मलिक विषयावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आमदार अमोल मिटकरी यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मलिक विषयाला घेऊन आगामी काळात महायुती सरकारमध्ये मतभेद निर्माण होतात की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमदार मिटकरी म्हणाले की, शिवसेनेचा एकता शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीचा सरकार सत्तेवर आहे. सरकारमध्ये तीनही पक्षांना सारखा मान आहे. त्यामुळे एखाद्या पक्षातील एखाद्या नेत्याबद्दल काही आक्षेप असल्यास तो चर्चेतून सोडवता आला असता. मात्र भाजपकडून नवाब मलिक यांच्या विषयावर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवण्यात आले. हे पत्र व्हायरल झाल्याने चुकीचा संदेश गेल्याची भावना आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक आमदारांनी देखील हीच भावना व्यक्त केली. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर वाद होऊ शकतो, अशी शक्यता सुरुवातीपासूनच वर्तवण्यात येत होती. वैद्यकीय जामिनावर बाहेर आल्यानंतर नवाब मलिक हे अधिवेशनात सहभागी होतील, असे अनेकांचे म्हणणे होते. अपेक्षेप्रमाणे मलिक हे गुरुवारी (ता. 7) कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर विधान भवन परिसरात दाखल झालेत. विधान भवन परिसरात आल्यानंतर मलिक यांनी आपण कोणत्याही गटात नाही, असे स्पष्ट केले.
विधानसभेत दाखल झाल्यानंतर मात्र नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवरील सगळ्यात मागच्या ओळींमधील जागा मिळवली. या कृतीतून त्यांनी काही न बोलता आपण शरद पवारांसोबत नव्हे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असल्याचे संकेत दिले. नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसताच भाजपच्या गटामधील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डची संबंध असल्याच्या कारणावरून भाजपने सर्वाधिक रान पेटविले होते. त्यामुळे मलिक सत्ताधारीबाकांवर आल्यानंतर भाजप त्यांचा स्वीकार करते का, याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळात होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर भाजपने नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवत भाजपने मलिक यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यावर आक्षेप नोंदवला. मात्र ज्या पद्धतीने भाजपने मलिक यांच्या मुद्द्यावर पत्रप्रपंच केला, त्यावर अजित दादांचे अनेक सहकारी नाराज झाले आहेत. भाजपनं चार भिंतीआड ही चर्चा करायला हवी होती, असा आता अजित दादांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपनं नवाब मलिक यांना विरोध करतात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानेही मलिक यांच्या नावापुढे लाल फुले मारा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली.
भाजपच्या तुलनेत शिंदे गटाने केवळ मौखिक मागणी केल्याने त्यांच्या प्रति राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदारांचा रोष थोडा कमी आहे. अशात आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपबद्दल नाराजी बोलून दाखवली. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर आज सकाळी (ता. 8) आमदार प्रवीण दरेकर यांनी भाजपची भूमिका मांडली. विधान भवनात प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पत्र योग्य असल्याचे नमूद केले.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.