Nagpur Winter Session Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session : लोकसभेतील घटनेला 24 तास उलटत नाही,तोच नागपूर विधानसभेतही घोषणाबाजी...

जयेश विनायकराव गावंडे

Winter Session 2023 : संसदेची हिवाळी अधिवेशन नवी दिल्ली येथे सुरू असताना दोघांनी लोकसभेच्या गॅलरीतून उडी मारत गॅस गनचा वापर केला. एका तरुणीने संसदेच्या परिसरातही निदर्शने केली. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी (ता. 14) नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान घोषणाबाजीचा प्रकार घडला.

विधानसभेचे कामकाज सुरू असताना गॅलरीतून आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विधानसभेत मोठी खळबळ उडाली. घोषणाबाजी होत असल्याचा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी गॅलरीचा परिसर गाठत हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतले. (Nagpur Winter Session)

कामकाज सुरू असताना विधानसभेत हा प्रकार घडल्याने. आमदारांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात भाजपचे मुख्य प्रतोद आमदार आशिष शेलार यांनी तीव्र आक्षेप घेतला. विधान भवनात ही कसली सुरक्षा आहे? असा सवाल आमदार शेलार यांनी केला. लोकसभेत घोषणाबाजीने संपूर्ण देशात खळबळ उडाली असताना, विधान भवनात हा प्रकार घडतो, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. (Parliament security breach)

लोकसभेतील घटनेला 24 तास हे उलटत नाही तोच विधानसभेत कडक सुरक्षा असतानाही घोषणाबाजी करण्यात आल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. संसदेतील प्रकारानंतर नागपुरातील विधान भवनात येणाऱ्या व्यक्तींना पासेस देण्याचे काम थांबविण्यात आले आहे, याकडेही आमदार शेलार यांनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तात्काळ कारवाई करण्याचे आदेश...

विधानसभेच्या अध्यक्षांकडे कुणीतरी हातवारे करून घोषणाबाजी करतो? कोण आहे ही व्यक्ती? त्यांना प्रवेश कसा मिळाला? विधानसभेची सुरक्षा कशी काय भेदली? असे प्रश्न उपस्थितीत करुन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लावून धरली. आमदार शेलार यांच्या बाजूने अन्य काही सदस्यांनी अध्यक्षांना हा काय प्रकार आहे, याबद्दल विचारणा केली.

विधानसभेतील सदस्य आक्रमक झाल्याचे पाहताच तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी याप्रकरणी चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत. संसदेतील निदर्शनाचे प्रकरण ताजे असतानाच नागपुरात गुरुवारी घडलेल्या या प्रकारामुळे विधान सभेतील सचिवालयाने सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यानंतर चांगलेच फैलावर घेतले.

विधान भवन परिसरातील सुरक्षा अधिकारी व विधान भवनाबाहेरील परिसरात तैनात असलेल्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना याप्रकरणी चांगलेच खडे बोल ऐकावे लागले. विधान भवनातील सुरक्षा बुधवारी (ता. 13) दुपारपासूनच कडक करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी विधान भवन परिसरात येणाऱ्या या सुरक्षा वेढ्याचा फटका बसला.

अभ्यागत प्रवेश पास असतानाही ओळखीचे पुरेसे पुरावे सोबत नसल्याने, अनेकांना विधान भवन परिसरात प्रवेश नाकारण्यात आला. दिवसभर विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा चाचणी पार करून आत जाण्यासाठी येथे येणाऱ्यांचा संघर्ष सुरू होता. अशातच विधानसभेच्या गॅलरीत झालेल्या घोषणाबाजीमुळे शुक्रवारपासून (ता. 15) कुणाचाही मुलाहीजा बाळगू नका, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT