NCP Leaders in Buldhana. Sarkarnama
विदर्भ

Rajya Sabha Election : घर तिथे ‘घड्याळ’ नेणाऱ्या नाझेर काझींचा ‘टाइम’ बदलणार का?

NCP Politics : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी कार्यकारिणीत ठराव मंजूर

सरकारनामा ब्युरो

गजानन काळुसे

Bhuldhana News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून आता जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी कार्यकारिणीने रितसर ठराव मंजूर केला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी सध्या राजकीय पक्षांची कंबर कसली आहे. अशात बुलढाण्यातून काझी यांचे नाव अजितदादांना पाठविण्यात आले आहे. काझी यांच्या नावाला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित कार्यकारिणीने सर्वानुमते मंजुरी दिली आहे.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सध्या राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सहा उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांना दादांनी संधी प्रदान करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी, असा ठराव तुकाराम अंभोरे पाटील यांनी मांडला. त्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिले. राज्यसभेच्या निवडणुकीत महायुतीत एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.

ॲड. नाझेर काझी यांना या जागेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. काझी यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत. शाहु, फुले, आंबेडकर चळवळीचे सुरुवातीपासून ते पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे सर्व जातीधर्माचे लोक त्यांचा आदर करतात, असे ठरावात नमूद आहे. ॲड. काझी उच्च शिक्षित आहेत. त्यांना उमेदवारी दिली, तर विदर्भाला न्याय देण्यासोबतच मुस्लिम समाजाला सुद्ध न्याय दिला जाईल. त्यामुळे काझी यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव मंजूर करून पक्षाकडे पाठविण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घर तिथे घड्याळ मोहीम

काझी यांना पक्षांकडे विधानसभेची संधी देण्याची दोनदा मागणी करण्यात आली होती. परंतु त्यांना पक्षांकडून संधी मिळू शकली नाही. यावेळेस तरी राज्यसभेचे उमेदवारी देण्याची अपेक्षा पदाधिकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काझी यांनी जिल्ह्यात ‘गांव तिथे शाखा, घर तिथे घड्याळ’ या अभियानाची आखणी व अंमलबजावणी त्यांनी केली. त्यामुळे आता त्यांचा ‘टाइम’ राष्ट्रवादी काँग्रेसने बदलण्याची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तसेच सभासद नोंदणी अभियानातही काझी यांनी उल्लेखनीय काम केले आहे. कार्यकर्त्यांशी सतत समन्वय व संपर्क ठेवून ते असतात. त्यांना विश्वासात घेऊन काम करणे, त्यांच्या सूचनांचा आदर करणे, वादविरहित संघटना उभी करण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक आंदोलनांचे नेतृत्वही त्यांनी केले आहे.

परगण्यावर जहागिरदारी

सिंदखेडराजा परगण्यावर काझी घराण्याची 1450 दरम्यान 150 वर्ष जहागीरदार होती. त्यानंतर ही जहागिरदारी स्थानिक मूळ घराण्याकडे हस्तांतरित झाली. त्यानंतर लखोजीराव राजे जाधव यांच्याकडे सिंदखेडराजाची जहागिरी हस्तांतरित झाली. जहागिरदारीच्या 150 वर्षाच्या काळात काझी घराण्याचे रयतेशी सलोख्याचे व सौहार्दपूर्ण संबंध होते असेही ठरावात नमूद आहे. त्यासाठी भारतीय इतिहासातील नोंदीचा दाखला देण्यात आला आहे. लखुजीराव राजे जाधव यांच्या काळात न्याय निर्वाळा करण्यासाठीच पाच सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात काझी घराण्याचे सदस्य होते.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT