Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : पुन्हा एकदा सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूक !

जयेश विनायकराव गावंडे

Nana Patole News : मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. मात्र, हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले, पण या विधेयकावर सरकारने चर्चाही केली नाही. केवळ एकपात्री प्रयोग सादर केला आणि मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

सरकारने हा निर्णय घाईघाईत घेतला असून, हे आरक्षण न्यायालयात टिकेल का, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मराठा समाजाची ही घोर फसवणूक असल्याचाही आरोप पटोले यांनी केला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आंदोलन सुरू केले आहे. आजही ते उपोषण करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. गुलालही उधळला, मग जरांगे पाटील यांना उपोषण का करावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना काय शब्द दिला होता, ते जनतेसमोर स्पष्ट करावे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध केले आहे, असा सरकारचा दावा आहे. मुळात या सर्व्हेवर अनेक शंका उपस्थित झालेल्या आहेत. सहा दिवसांत मुंबई शहरातच 26 लाख लोकांचा सर्व्हे केला, हे आश्चर्यकारक आहे.

काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. परंतु ते देवेंद्र फडणवीस सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. फडणवीस सरकारने 2018 मध्ये अधिवेशन बोलावून एकमताने 12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, पण हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. आता पुन्हा मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विधिमंडळात एकमताने पारित करण्यात आलेला आहे. भाजप सरकारने घेतलेला निर्णय न्यायालयात टिकेल का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT