Nana Patole Vs Manoj Jarange Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation : ''आज्याच्या, बापाच्या जात प्रमाणपत्रावर मराठा असताना...'' ; नाना पटोलेंचा जरांगेंना सवाल!

सरकारनामा ब्युरो

अभिजित घोरमारे -

Bhandara News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत सावध भूमिका घेणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आता या वादात उडी घेतल्याचे दिसत आहे. ‘तुमच्या आज्याच्या, बापाच्या जात प्रमाणपत्रावर स्पष्टपणे मराठा लिहिले असताना कुणबी प्रमाणपत्र घेऊन करता काय?’, असा सवाल नाना पटोलेंनी(Nana Patole) मनोज जरांगे पाटलांना केला आहे. पटोलेंच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

भंडारा जिल्हातील लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथील जाहीर कार्यक्रमात आमदार पटोले यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांच्या टीका व रोषाला पात्र ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मांढळ येथील सभेत बोलताना पटोले म्हणाले की, ‘आम्ही ओबीसी प्रवर्गात असलो, तरी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आम्हाला आजोबा आणि वडिलांच्या जातीचे पुरावे असलेली कागदं जोडावी लागतात. त्यानंतर स्वत:चे जात प्रमाणपत्र द्यावे लागते. त्याची तपासणी झाल्यानंतरच जात प्रमाणपत्र भेटतं व ते वैध ठरतं.

ते वैध ठरविण्यासाठीही कसरत करावी लागते. जात प्रमाणपत्रासाठी इतकी मेहनत घ्यावी लागते. हे सर्वांनाच माहिती आहे.’ अशात आजोबांच्या व वडिलांच्या प्रमाणपत्रावर मराठा लिहिलेले असेल, तर कितीही नोंदी सापडल्या तरी काय फायदा होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाच्या विषयापासून आमदार नाना पटोले यांनी आतापर्यंत स्वत:ला दूर ठेवले होते. काँग्रेस पक्षाचे अन्य नेते आरक्षणावर वेगवेगळी वक्तव्यं करून वाद ओढवून घेत असताना पटोले शांत होते. मात्र अचानक त्यांनी जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.

नाना पटोले हे स्वत: कुणबी आहेत. जातीचे प्रमाणपत्र घेताना व त्याची वैधता कायम ठेवाताना किती अडचणींचा सामना करावा लागतो, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्यात दररोज शाब्दिक चकमक सुरू आहे. अगदी एकमेकांना एकेरी संबोधण्यापर्यंत हे शाब्दिक युद्ध पोहोचले आहे. अशात नाना पटोले यांच्या विधानावर जरांगे नक्कीच प्रतिक्रिया व्यक्त करतील, असे बोलले जात आहे.

मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. ही मुदत वाढावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सरकारमधील मंत्री जरांगेंची भेट घेत आहेत. त्यातच पटोले यांनी हे विधान केलं आहे.

राज्यात आतापर्यंत 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार सर्वांना तत्काळ जात प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी आहे. या मागणीवर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती काम करीत आहे. अशातच जरांगे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर आले आहेत. त्यामुळं वाद वाढत आहे. मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका कायम ठेवल्यानं त्यांना अटक करण्याची मागणीही ओबीसी संघटनांकडून आता होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT