Navneet Rana reveals condition for Rajya Sabha nomination Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana Rajya Sabha : राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत या; पण अट मान्य नव्हती! नवनीत राणांचा खुलासा, महायुतीत खळबळ

NCP offered Rajya Sabha seat to Navneet Rana: सुनेत्रा पवार-पार्थ पवारांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याचा दावा करत, 'भाजप सोडणार नाही' म्हणत नवनीत राणांनी पडद्यामागील राजकीय घडामोडी आणली समोर.

Pradeep Pendhare

Mahayuti Politics Maharashtra: महायुतीतील राज्यसभेच्या रिक्त जागेवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या एका खुलाशामुळे महायुतीतील पडद्यामागील राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अट घालण्यात आली होती, मात्र ती आपल्याला मान्य नसल्याचा दावा नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केला आहे.

महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांची खासदारकी जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने उद्योगपती राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर केली आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.

दरम्यान, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलेल्या पोस्टमुळे या संपूर्ण प्रक्रियेमागील राजकीय घडामोडींवर प्रकाश पडला आहे. आदरणीय सुनेत्रावहिनी आणि पार्थदादा यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट घालण्यात आली. ही अट मला मान्य नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

राणा यांनी पुढे सांगितले की, मी भाजपची प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता आहे. कोणत्याही पदासाठी मी माझी विचारधारा बदलणार नाही. भाजपसाठी काम करत राहणे हीच माझी भूमिका आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची जागा भाजपला सोडण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, उमेदवारी मिळाली नसतानाही नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे आभार मानले. माझ्यावर विश्वास ठेवून राज्यसभेसाठी विचार केल्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय हालचाली आणि नेत्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या हालचालींनी महायुतीतील समन्वय, राजकीय समीकरणे आणि भविष्यातील सत्तासंघर्ष यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते. नवनीत राणांसारखे व्यक्तिमत्त्व राष्ट्रवादीने का सोडले? असा सवाल करत त्यांनी शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले होते. मात्र आपल्या सविस्तर पोस्टमध्ये नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्या या प्रस्तावाचा कोणताही उल्लेख टाळला आहे.

राज्यसभेच्या उमेदवारीवरून झालेला हा खुलासा आता केवळ एका जागेपुरता मर्यादित राहिलेला नाही. उलट महायुतीतील राजकीय विश्वास, पक्षीय निष्ठा आणि पडद्यामागील चर्चांवरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT