NCP Wins Against MNS Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : 'मनसे' विरुद्ध सामना जिंकत 'NCP'नं दिलं शरद पवारांना ‘बर्थ डे गिफ्ट’

प्रसन्न जकाते

NCP SP Vs MNS : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’च्या वतीने आयोजित ‘क्रिकेटनामा’च्या दुसऱ्या सीझनमधील दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार)(Sharad Pawar) टीमनं आपल्या ‘साहेबांना’ त्यांच्या वाढदिवसाचं खास ‘बर्थ डे गिफ्ट’ दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ‘सरकारनामा’चे नागपूर विभागीय वरिष्ठ प्रतिनिधी अतुल मेहरे यांनी नाणेफेक केली. यावेळी ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत उपस्थित होते. सामन्याला सुरुवात झाल्यापासूनच टीम मनसेचा डाव गडगडलेला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 12) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आलेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या या स्पर्धेचा पहिला सामना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात झाला.

सामन्याला सुरुवात झाल्यानंतर मनसेच्या खेळाडूंनी फटकेबाजीला सुरुवात केली. दोन षटकार मारल्यानंतर राष्ट्रवादीच्या समीर शेख यांनी एकापाठोपाठ मनसेचे(MNS) दोन गडी बाद केले. त्यानंतर आदित्य दुरूगकर आणि राजेश यांनी मनसेचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोन षटकांनंतर पुन्हा गोलंदाज अलोक तिवारी यांनी आदित्य आणि राजेश यांना बाद केले.

मनसेचे अभिषेक आणि सुजय यांनीही आक्रमकपणे मैदान मारण्याचा प्रयत्न केला. परंतु लगेचच अभिषेक झेलबाद झालेत. तीन षटकं पूर्ण होईपर्यंत मनसेची धावसंख्या 6 बाद 30 होती. यश आणि ऋषी खेळ असताना लगेच यश हे झेलबाद झालेत आणि संपूर्ण टीम मनसे ‘ऑलआऊट’ झाली. 7 गडी गमावून मनसेने 31 धावांचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस टीमपुढं ठेवलं.

एनसीपीचे मोहम्मद इरफान आणि राहुल कदम सलामीला आले होते. अभिषेक यांनी पहिलं षटक टाकलं. राष्ट्रवादीच्या खेळाडूंनी येताच चौकार, षटकार मारणं सुरु केलं. त्यामुळे दोन चेंडूतच धावसंख्या 11 वर पोहोचली. निखिल झाडे यांच्या दुसऱ्या षटकात एनसीपीने चौकार लगावले. दुसऱ्या षटकापर्यंत एनसीपीनं 20 धावा केल्या. आदित्य दुरूगकर यांनी इरफान यांना त्रिफळाचित करीत एनसीपीचा पहिला गडी बाद केला. त्यानंतर आलेल्या उज्ज्वल नागपुरे यांनाही त्रिफळाचित करीत दुसरा बळी टिपला.

राहुल कदम आणि मोहम्मद अन्सारी हे त्यानंतर एनसीपीसाठी मैदानावर आलेत. विजयी चौकार मारत राष्ट्रवादी काँग्रेसने सामना जिंकला. ‘सरकारनामा’चे विभागीय वरिष्ठ प्रतिनिधी अतुल मेहरे आणि रश्मी माने यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे समीर शेख यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT