Team Sarkarnama Vs MNS Challangers : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : राज ठाकरे यांच्या मनसैनिकांचा दबदबा राजकारणातच नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावरही बघायला मिळाला. उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करीत मैदानावर सुसाट धावलेल्या मनसेच्या इंजिननं सिग्नल मिळताच विजयाच्या रुळांवर तुफान स्पीड पकडली व आपल्या ‘राज साहेबांना’ विजयाचं गिफ्ट दिलं.
सकाळचे (मुंबई) संपादक राहुल गडपाले यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. टीम सरकारनामाने नाणेफेक जिंकली. संघाचे कर्णधार तथा सरकारनामाचे संपादक ज्ञानेश सावंत यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मनसेचे(MNS) नागपूर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी आपण जोरदार गोलंदाजी करू असा निर्धार केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे सोमवारी (ता. 11) थाटात उद्घाटन झाले. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या या स्पर्धेचा पाचवा सामना सरकारनामा आणि मनसे यांच्यात झाला.
सरकारनामा संघाचे अजित भालेराव आणि प्रदीप पेंढारे हे ‘ओपनिंग’ फलंदाज म्हणून उतरले. मनसे टीमचे कर्णधार आदित्य दुरूगकर यांनी पहिलं षटक टाकण्याचा निर्णय घेतला. पहिलाच चेंडू ‘वाइड’ गेल्यानं मोफतच्या धावेने सरकारनामाचं खातं उघडलं.
अजित हे फटकेबाजी करीत असतानाच तिसऱ्याच चेंडूवर प्रदीप पेंढारे हे यष्टीचित झाले. त्यामुळं आदित्य यांना एक विकेट मिळाली. सूरज सावंत यांनी मैदानावर येताच षटकार लगावला. पहिल्या षटकात एक बाद 16 ही सरकारनामाची धावसंख्या होती.
अभिषेक पारधी यांनी मनसेकडून दुसरं षटक टाकलं. धाव काढण्याच्या बेतात धावबादचं अपिल झालं. मात्र तिसऱ्या पंचांनी हिरवा कंदील दाखवत नाबादचा निर्णय दिला. त्यानंतरच्या चेंडूवर सूरज सावंत बाद झालेत. सूरज यांच्यानंतर आलेल्या तुषार पाटील हे देखील त्रिफळाचित झालेत मात्र तो ‘नोबॉल’ ठरला आणि संघाला ‘फ्रीहिट’ मिळाली. त्यानंतर सरकारनामाच्या फलंदाजांनी चांगलेच फटके लगावले.
निखिल झाडे यांचं तिसरं षटक सरकारनामासाठी महागाचं ठरलं, तुषार पाटील हे बाद झाले. कुणाल काळसे यांनीही चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही. सरकारनामाचे संपादक ज्ञानेश सावंत यांनी फलंदाजीला आल्यानंतर अभिषेक यांच्या चेंडूंना टोलवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाचवं षटक संपत असताना कुणाल धावबाद झाले.
चैतन्य मचाले हे ज्ञानेश सावंत यांच्या मदतीला आले. परंतु लगेच सावंत हे देखील त्रिफळाचित झाले. मात्र पंचांनी रिव्ह्यू पाहिल्यानंतर ते ‘आऊट’ नसल्याचं स्पष्ट केलं. परंतु पाच षटकं संपल्यानं अंतिम धावसंख्या सहा बाद 57 होती.
यानंतर मनसेच्या टीमकडून अभिषेक चौकसी आणि ऋषीराज यांनी फलंदाजीला सुरुवात केली. अजित भालेराव यांना पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकार लगावला. पहिल्या षटकात नऊ धावा मनसेला मिळाल्या. सूरज सावंत यांच्या दुसऱ्या षटकात मनसेने फटके मारण्याचा प्रयत्न केला. सरकारनामाचे जगदिश पानसरे यांनी यावेळी ऋषीराज यांचे फटके रोखले. परंतु दोन षटकात मनसेने 15 धावा केल्या होत्या आणि तोपर्यंत त्यांचा एकही गडी बाद झाला नव्हता.
दरम्यान ऋषीराज यांना दुखापत झाल्यानं त्यांच्या जागी यशराज चौकसी यांनी सामना खेळला. तुषार यांनी डावखुरी गोलंदाजी करीत मनसेच्या धावांचं इंजिन रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यशराज चौकसी झेलबाद झाले. निखिल झाडे फलंदाजीला आले तेव्हा 12 चेंडूत 30 धावांची गरज मनसेला होती.
त्यानंतर मात्र फलंदाजांचं इंजिन जोरात धावलं आणि चौकार, षटकार लगावले. त्यामुळं 7 चेंडूत 5 धावा असं संख्याबळ पोहोचलं. 6 चेंडूत 4 धावांची गरज असताना सूरज सावंत यांनी ‘वाइड’ टाकत एक अतिरिक्त धाव दिली. त्यानंतर चौकार मारत मनसेने सामना जिंकला.
सामनावीराचा पुरस्कार विनोद राऊत व ‘सरकारनामा’च्या रश्मी माने यांच्या हस्ते अभिषेक चौकसी यांना देण्यात आला. नीलेश नातू हे सामन्याचे पंच होते. आकाश यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.